डोनाल्ड ट्रम्प यांच्या २ वर्षात ८ हजार फसव्या घोषणा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या २ वर्षात ८ हजार फसव्या घोषणा

डोनाल्ड ट्रम्प यांची कारकिर्द खोटी आश्वासने देण्यासाठी प्रसिद्ध

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळाला दोन वर्ष पुर्ण झाली आहेत. या दोन वर्षात त्यांनी केलेल्या कामगिरीचा एक अहवाल प्रसिद्ध झाला असून यात ट्रम्प यांनी दोन वर्षांत ८,१५८ खोटी आश्वासने दिले असल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने याबद्दल माहिती दिली असून ‘द फॅक्ट चेकर्स डेटाबेस’ यांनी हा अहवाल तयार केला आहे. ट्रम्प यांनी केलेल्या प्रत्येक वक्तव्याचे आणि मांडलेल्या भूमिकांचे विश्लेषण करुन त्यानुसार हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

या अहवालानुसार ट्रम्प यांनी पहिल्या वर्षात दिवसाला ५.९ खोटी आश्वासने दिलेली आहेत. मात्र फसव्या घोषणा आणि संदर्भहीन वक्तव्ये करण्याचा त्यांचा वेग दुसऱ्या वर्षात वाढला. दुसऱ्या वर्षात प्रतिदिन १६.५ म्हणजे आधीपेक्षा तिप्पटपटीने खोटी आश्वासने दिली आहेत. फॅक्ट चेकर्सचे म्हणणे आहे की, ट्रम्प यांनी कार्यालयाचा ताबा घेतल्यापासून तब्बल ८,१५३ चुकीची, दिशाभूल करणारी विधाने केली आहेत. ट्रम्प यांनी दुसऱ्या वर्षात सर्वात जास्त म्हणजेच सहा हजार फसवी विधाने केली आहेत. पहिल्या १०० दिवसांमध्ये ट्रम्प यांनी ४९२ बिनबुडाचे दावे केले होते.


डोनाल्ड ट्रम्प यांनी ७०० दिवसात दिली ७ हजार खोटी आश्वासने

डिसेंबर महिन्यात देखील वॉशिंग्टन पोस्टने याच प्रकारचे वृत्त दिले होते. त्यावेळी ट्रम्प यांच्या फसव्या घोषणांची संख्या ही ७ हजारांच्या घरात होती. मात्र दोन ते तीन महिन्यांच्या काळात ती वाढून आठ हजारांवर गेली आहे.


द फॅक्ट चेकर्सने याबाबत सांगितले की, पहिल्या १०० दिवसांच्या कार्यकाळात ट्रम्प यांनी जितकी चुकीची विधाने केली होती, ती पाहून आम्ही आमच्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर आमच्या कामाचा आवाका वाढत गेला. ट्रम्प यांनी इमिग्रेशन बाबत सर्वात जास्त असत्य विधाने केली आहेत. २०१९ सुरुवातीच्या या तीन आठवड्यात त्यांनी ३०० वक्तव्ये केली आहेत. तर आतापर्यंत ही संख्या १,४३३ पर्यंत गेली असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या फसव्या घोषणांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे :

परराष्ट्रीय धोरण – ९००

व्यापार – ८५४

अर्थव्यवस्था – ७९०

नोकरी-रोजगार – ७५५

इतर – ८९९ (यामध्ये माध्यमांवरील चुकीचे आरोप आणि राष्ट्राध्यक्षांवर टीका करणाऱ्या लोकांबद्दल व्यक्त केलेला तिरस्कार सुद्धा आहे.)

First Published on: January 23, 2019 10:18 AM
Exit mobile version