पाकिस्तानमध्ये PPE साठी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना अटक

पाकिस्तानमध्ये PPE साठी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना अटक

सौजन्य - एपी

पाकिस्तानमध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स यांना पुरेशा सुरक्षा नाही आहेत. जीव धोक्यात घालून ते रुग्णांवर उपचार करत आहेत. दरम्यान, या डॉक्टरांनी याविरोधात निषेध केला. कोरोना विषाणूशी लढा देताना सुरक्षेच्या साधनांच्या अभावाचा निषेध करत असलेल्या ५० हून अधिक डॉक्टरांना सोमवारी पोलिसांनी पाकिस्तानच्या क्वेटा शहरातून अटक केली, अशी माहिती पोलिस आणि डॉक्टरांनी दिली. शहरातील मुख्य रुग्णालयाजवळ १०० हून अधिक डॉक्टरांनी रॅली काढली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर निदर्शनं करायला गेले. मुख्यमंत्र्यांच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी त्यांना पांगवण्यासाठी लाठ्यांचा वापर केला. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी अब्दुल रझाक चीमा यांनी सांगितलं की, “आम्ही कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल ५३ डॉक्टरांना ताब्यात घेतलं आहे.” सरकारने त्यांना सोडण्याचे आदेश देण्यापूर्वी पोलिसांनी डॉक्टरांना ताब्यात घेतल्याचं चीमा म्हणाले.


हेही वाचा – “भारताने औषधाची मदत केली तर ठीक, नाही तर…”, ट्रम्प यांनी दिला भारताला इशारा


बलुचिस्तान सरकारच्या प्रवक्त्या लियाकत शहवानी यांनी एएफपीला सांगितले की, मास्क आणि गॉगलसारख्या वैयक्तिक संरक्षक उपकरणं (पीपीई) उपलब्ध नसल्याबद्दल डॉक्टर निषेध करत होते. “पीपीई लवकरच देण्यात येईल असं आश्वासन आम्ही त्यांना दिलं होतं पण त्यांनी निषेध सुरू केला,” असं शहवानी म्हणाल्या. पुढे म्हणाल्या की, सोमवारी सरकारकडून पुरवठा झाल्यानंतर अधिकारी संरक्षणात्मक उपकरणे वितरीत करण्याचा विचार करत आहेत. कोरोनाग्रस्तांवर उपचार करत असताना रुग्णालयात सुरक्षा उपकरणांची तीव्र कमतरता असल्याबद्दल पाकिस्तानमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी अनेक आठवडे तक्रारी केल्या आहेत. क्वेटा येथील डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष यासिर अचकझाई यांनी पत्रकारांना सांगितले की, डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचार्‍यांच्या संरक्षणासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनाचे सरकार पालन करीत नाही आहे. म्हणून त्यांनी आमच्या हक्कासाठी आम्हाला आंदोलन करण्यास भाग पाडलं, असं अचकझाई म्हणाले.

पाकिस्तानमध्ये ३ हजार ७६६ कोरोनाचे रुग्ण आहेत. तर ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यात, कोरोनामुळे पाकिस्तानमधील डॉक्टर आणि परिचारिका दोघांचा मृत्यू झाला होता, तर किमान दोन डझन इतर वैद्यकीय कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली.

 

First Published on: April 7, 2020 8:56 AM
Exit mobile version