सर्वात प्रभावी Sputnik V लसीची किंमत जाहीर, ९१.६ टक्के परिणामकारक

सर्वात प्रभावी Sputnik V लसीची किंमत जाहीर, ९१.६ टक्के परिणामकारक

डॉ रेड्डी लॅबरोटरीजने रशियन Sputnik V लसीचा पहिला डोस भारतात प्रायोगिक तत्वावर देण्यासाठीची तयारी दर्शवली आहे. मर्यादित स्वरूपासाठी ही लस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने कंपनीने स्पष्ट केले आहे. डॉ रेड्डी लॅबरोटरीज ही रशियन डायरेक्ट इनवेस्टमेंट फंड या कंपनीची भारतीय पार्टनर कंपनी आहे. कंपनीने या लसीच्या डोसची किंमतही जाहीर केली आहे. Sputnik V लसीचा डोस ९४८ रूपयांना उपलब्ध होणार आहे. तर डोसमागे ५ टक्के जीएसटीही आकारण्यात येणार आहे. त्यामुळे जीएसटीसह हा लसीचा डोस ९९५.४ रूपयांना उपलब्ध होईल. ही लस कोरोनाविरोधी उपचारासाठी ९१.६ टक्के प्रभावी आहे. भारतात लसीकरणाच्या मोहीमेसाठी मंजुर झालेली ही तिसऱ्या कंपनीची लस आहे.

Sputnik V लस उपलब्ध करून देण्याचा हा प्रायोगिक प्रकल्प असून हा लसीचा डोस हैद्राबाद येथे निरीक्षण करण्यात आला असेही कंपनीने स्पष्ट केले. लसींच्या पहिल्या डोसची खेप ही भारतात १ मे रोजी दाखल झाली. त्यानंतर सेंट्रल ड्रग्ज लॅबरोटरी, कसौली येथून १३ मे रोजी या लसीसाठी क्लिअरन्स मिळाला. येत्या काही दिवसांमध्ये लसीचे आणखी डोस अपेक्षित आहेत. भारतीय लस निर्मिती कंपन्यांकडूनही या लसीची निर्मिती आगामी काळात अपेक्षित आहे. Sputnik V कंपनी भारतातील सहा कंपन्यांसोबत संपर्कात असून वेळोवेळी लागणाऱ्या परवानग्या आणि पुरवठ्यासाठी कंपनीकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. देशभरात लस पुरवठ्यासाठी सुरू असलेले प्रयत्न पाहता कंपनीकडून भारतीयांसाठी लस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. कोरोनाविरोधी लढाईत सध्या लसीकरण हेच महत्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे. भारतातील लसीकरणाच्या मोहीमेला पाठिंबा देणे हेच आमचे प्राधान्य आहे. भारतीयांच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्यासाठी आम्ही भारतीयांसोबत आहोत असे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जी. वी. प्रसाद यांनी स्पष्ट केले.

Sputnik V लसीचे डोस भारतात तयार झाल्यानंतर या डोसची किंमत आणखी कमी होण्याचा अंदाज आहे. ही लस पुढील आठवड्यापासून बाजारात उपलब्ध होणार आहे. सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या तुलनेत ही लस अधिक परिणामकारक आहे. जगभरात सर्वाधिक परिणामककारक असलेल्या तीन लसींपैकी एक अशी Sputnik V ही लस आहे. या लसीच्या दोन्ही डोसला जगभरातून पसंती मिळाली आहे. जागतिक बाजारात या डोसची किंमत ही १० डॉलर्सपेक्षाही कमी आहे. या लसीचा डोस जगभरात २० लाख लोकांना आतापर्यंत देण्यात आला आहे. ही लस लिक्विड आणि पावडर अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध होणार आहे. या लसीचा डोस लिक्विड स्वरूपात -१८ डिग्री तापमानाला ठेवणे गरजेचे आहे. तर पावडर २ डिग्री ते ८ डिग्री दरम्यान स्टोअर करणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या लसीच्या वितरणासाठी डॉ रेड्डी कंपनीकडून करार करण्यात आला आहे.


 

First Published on: May 14, 2021 1:39 PM
Exit mobile version