ड्रग्जच्या दलालाची झाली गोची; पोलिसालाच पाठवलं रेटकार्ड!

ड्रग्जच्या दलालाची झाली गोची; पोलिसालाच पाठवलं रेटकार्ड!

फोटो सौजन्य - टाईम्स नाऊ

एरवी कोणतंही बेकायदा कृत्य करणारी गुन्हेगार मंडळी प्रचंड काळजी घेत असतात. त्यांच्या कारनाम्यांचा सुगावा कुणालाही लागू नये, यासाठी त्यांना प्रत्येक वेळी लक्षपूर्वक नियोजन करावं लागतं. त्यामध्ये घोळ झाला, तर त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता असते. पण एका पठ्ठ्याच्या हा घोळ चांगलाच अंगलट आला आहे. अंमली पदार्थांची छुप्या पद्धतीने विक्री करणारा हा भामटा इतका बिनधास्त झाला की गिऱ्हाइक मिळेल या अपेक्षेनं त्यानं चक्क पोलीस अधिकाऱ्यालाच अंमली पदार्थांचं रेटकार्ड पाठवून दिलं. मग काय, व्हायचं तेच झालं! पोलिसांनी त्याच्यावर धाड घातली, आणि त्याला हवा खाऊ घातली ‘आतली’!

३ हजार डॉलर किंमतीचं ड्रग्ज सापडलं!

मार्टीनास बेनोसेन्को नावाचा हा ड्रग डीलर त्याच्या ब्रिटनमधल्या परिसरात म्हणजे लीड्समध्ये अंमली पदार्थांची विक्री करायचा. लीड्स फेस्टिव्हलमध्ये भरपूर गिऱ्हाइकं मिळतील, म्हणून या फेस्टिव्हलमध्ये हे महाशय कोकेनच्या २८ बॅगा आणि एमडीएमएच्या ६७ टॅबलेट म्हणजेच तब्बल ३ हजार अमेरिकी डॉलर इतक्या किंमतीचे अंमली पदार्थ घेऊन दाखल झाला. इच्छुक गिऱ्हाइकांना तो मोबाईलवरून रेटकार्ड पाठवत होता. पण चुकून या पठ्ठ्यानं तिथल्या एका पोलीस अधिकाऱ्यालाच ड्रग्जचं रेटकार्ड पाठवलं. झालं. पोलीस अधिकारी चांगलाच खवळला आणि त्यानं बेनोसेन्कोचा माग काढायला सुरुवात केली.

पैशांच्या लालसेपोटी विकत होता ड्रग्ज

शेवटी ब्रिटिश पोलीस म्हटल्यावर बेनोसेन्कोचा माग काढणं त्यांच्यासाठी फार कठीण नव्हतं. त्यांनी काही वेळातच त्याला गाठला आणि थेट अटक केली. त्याच्या चौकशीत कळलं की तो एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करत होता. पण त्याने नोकरी सोडली. त्यानंतर कमी वेळात जास्त नफा कमावण्याच्या लालसेपोटी त्यानं ड्रग्ज विकायला सुरुवात केली. पण त्याचा बेत फसला आणि तो पोलिसांनाच रेटकार्ड पाठवल्यामुळे अडकला.

First Published on: February 6, 2020 12:39 PM
Exit mobile version