‘जेबी’ वादळानंतर भूकंपाने जपान हादरले ; ९ जणांचा मृत्यू

‘जेबी’ वादळानंतर भूकंपाने जपान हादरले ; ९ जणांचा मृत्यू

जपानमध्ये भकंपाचा धक्का

जपानमध्ये ‘जेबी’ वादळाने आधीच हाहाकार केल्यानंतर आता भूकंपाचा तीव्र धक्क्याने जपान हादरले आहे. गुरुवारी सकाळी जपानच्या होक्काइदो भागामध्ये ६.७ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. यामध्ये ९ जणांचा मृत्यू ,१३० नागरिक जखमी, तर ४० जण बेपत्ता झाले आहेत. भूकंपाच्या तीव्र धक्क्यानंतर आता जपानमध्ये त्सुनामी येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

भूकंपामुळे ९ जणांचा मृत्यू

भूकंपाच्या तीव्र धक्क्यामुळे जपानमध्ये अनेक भागामध्ये भूस्खलनामुळे घरांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर वीज पूरवठा ठप्प झाला आहे त्यामुळे ३० लाखांपेक्षा अधिक घरांमध्ये अंधार आहे. होक्काइदो भागामध्ये मेट्रो सेवा ठप्प झाली तर होक्काइदो आणि न्यू चिटोस एअरपोर्टचे देखील नुकसान झाले आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३० नागरिक जखमी झाले आहेत तर ४० पेक्षा अधिक जण बेपत्ता झाले आहेत.

लोकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी सांगितले की, जपान सरकारने बचावकार्यासाठी कमांड सेंटरची स्थापना केली आहे. लोकांना वाचवणे सरकारची प्राथमिक जबाबदारी असणार आहे. बचावकार्यासाठी २५ हजार जवानांना पाठवण्यात आले आहे. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने लोकांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात येत आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू होक्काइदो शहरातील सप्पोरोपासून ६८ किलोमीटर दूर दक्षिण पूर्व भागात होता.

जेबी वादळामुळे १० जणांचा मृत्यू

जपानमध्ये मंगळवारी २५ वर्षानंतर आलेल्या सगळ्यात मोठ्या जेबी वादळाने आतापर्यंत १० जणांचा बळी घेतला आहे. या वादळामुळे संपूर्ण जपानमध्ये हाहाकार आहे. या वादळामुळे १५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहे तर १२ लाख पेक्षा अधिक लोकांना या वादळाचा फटका बसला आहे. वादळामुळे घरांचे गाड्याचे मोठे नुकसान झाले आहे.

First Published on: September 6, 2018 10:10 PM
Exit mobile version