ईडी करणार डी. के. शिवकुमार यांच्या मुलीची चौकशी

ईडी करणार डी. के. शिवकुमार यांच्या मुलीची चौकशी

काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांच्या अडचणीत वाढ; Money Laundering प्रकरणी न्यायालयाने बजावला समन्स

काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर होत असलेल्या सक्तवसुली संचालनाच्या (ईडी) चौकशीची झळ आता शिवकुमार यांच्या कुटुंबातील सदस्यांपर्यंत पोहचली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात डी. के. शिवकुमार यांची पत्नी उषा आणि मुलगी ऐश्वर्या यांनासुद्धा सक्तवसुली संचालनाकडून नोटीस पाठवण्यात आली असून १२ सप्टेंबर रोजी सक्तवसुली संचालनालयात हजर राहण्यास सांगितले आहे. वयाच्या २२ व्या वर्षी शिवकुमार यांच्या मुलीच्या नावे करोडोंची संपत्ती आहे.

अटकेविरुद्ध वोक्कालिंगा संघाचे प्रदर्शन

शिवकुमार यांच्या अटकेविरुद्ध वोक्कालिंगा संघाने राजधानी बंगळूरु येथे तीव्र विरोध प्रदर्शन केले. विशेष म्हणजे डी. के. शिवकुमार राजकीय दृष्ट्या मजबूत अशा वोक्कालिंगा समुदायाचे प्रतिनिधित्व करतात. डी. के. शिवकुमार सध्या आर्थिक गैरव्यवहाराच्या विविध प्रकरणात सक्तवसुली संचालनाच्या चौकशीला सामोरे जात आहेत.

गेल्या आठवड्यात शिवकुमार अटकेत

कर्नाटकमधील काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांना मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीने दिल्लीतून अटक केली होती. दिल्लीत सलग चौथ्या दिवसाच्या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकेनंतर काँग्रेसमधील दिग्गज नेते डी. के. शिवकुमार यांनाही ईडी म्हणजेच सक्तवसुली संचालनालयाने समन्स बजावली होती. गेल्याच वर्षी ईडीने शिवकुमार यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचे प्रकरण दाखल केले होते. मिळालेल्या माहितीनुसार कथित कर चोरी, हवाला यांच्या आधारे डी. के. शिवकुमार यांच्या विरोधात काही प्रकरणं दाखल करण्यात आली आहेत.

First Published on: September 11, 2019 4:04 PM
Exit mobile version