काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड होणार 19 ऑक्टोबरला; 17 ऑक्टोबरला मतदान

काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड होणार 19 ऑक्टोबरला; 17 ऑक्टोबरला मतदान

नवी दिल्ली : बड्या नेत्यांच्या राजीनाम्यामुळे एका पाठोपाठ एक धक्के खाणाऱ्या काँग्रेसच्या अध्यक्षाची निवड आता 19 ऑक्टोबर होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीच्या कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी दुपारी काँग्रेस कार्यकारिणीची व्हर्च्युअल बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला.

काँग्रेस पक्षाला मागील दोन वर्षांपासून झटक्यांवर झटके बसत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर कपिल सिब्बल, ज्योतिरादित्य सिंधिया आणि गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा दिला. तर आता तेलंगणमधील काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यसभा सदस्य एम ए खान यांनी राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणीची आज बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, प्रियंका गांधी व खासदार राहुल गांधी यांच्यासह अन्य ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते. या बैठकीत पक्षावर नाराज असलेले आनंद शर्माही उपस्थित होते.

सोनिया गांधी यांनी 2010 साली काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. मात्र 2019च्या लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खालल्यानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत आहेत. मात्र, आता त्यांची प्रकृती साथ देत नसल्याने त्या उपचारांसाठी राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत परदेशात जाणार आहेत. या काळात काँग्रेसची धुरा कोणाच्या हाती येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर दरम्यान ही निवडणूक होणार होती. पण नंतर ही तारीख पुढे ढकलण्यात आली.

आज झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक 17 ऑक्टोबरला तर, 19 ऑक्टोबरला मतमोजणी या कार्यक्रमावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 24 सप्टेंबरपासून नामांकन दाखल केले जाईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर आहे. विशेष म्हणजे, त्यापूर्वी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली येत्या 7 सप्टेंबरपासून काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ला प्रारंभ होणार आहे. तामिळनाडूच्या कन्याकुमारीपासून या यात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर 12 राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून प्रवास करत जम्मू-काश्मीरमध्ये तिचा समारोप होईल. एकूण 150 दिवस आणि 3500 किलोमीटर ही यात्रा चालेल. यादरम्यानच अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

First Published on: August 28, 2022 6:24 PM
Exit mobile version