ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समध्ये वणवा; आणीबाणी जाहीर

ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समध्ये वणवा; आणीबाणी जाहीर

ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स या राज्यात काल वणव्याच्या कारणामुळे आणीबाणी घोषित करण्यात आली. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावरील जंगल आगीने धुमसत असून या आगीत आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५० हून अधिक घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. याच पार्श्वभूमिवर ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स मध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

आणीबाणीचे परिणाम

ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स हा सर्वात गजबजलेला प्रांत आहे. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावरील जंगल आगीने धुमसत आहे. आतापर्यंतची अत्यंत धोकादायक आग असून स्थानिक रहिवासी या आपत्तीला तोंड देत आहे, अशी माहिती न्यू साउथ वेल्सचे आपत्कालीन सेवा मंत्री डेव्हिड इलियट यांनी दिली आहे. मागील तीन दिवसांपासून येथील वणव्याने भीषण रुप घेतले असून यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान अग्निशमन विभाग आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. आणीबाणी जाहीर झाल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे.

आगीमुळे प्रचंड नुकसान

राज्याच्या ईशान्येकडील आगीमुळे ८ लाख ५० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील वनसंपदा, शेती आणि गवताळ जमीन खाक झाली आहे. न्यू साउथ वेल्समध्ये जोरवारे वारे वाहू लागल्याने ही आग फैलावली. वेळीच आग आटोक्यात न आल्यास ही आग अधिक उग्र रुप धारण करण्याची शक्यता आहे. ही आग सिडनीपर्यंत पसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

First Published on: November 12, 2019 9:59 AM
Exit mobile version