१० दिवसांत पीएफच्या २८० कोटींचं वाटप! विक्रमी कामगिरी!

१० दिवसांत पीएफच्या २८० कोटींचं वाटप! विक्रमी कामगिरी!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काही दिवसांपूर्वी कोरोनाशी लढा देण्यासाठी जाहीर केलेल्या आर्थिक उपाययोजनांपैकी एक महत्त्वाची उपाययोजना होती ती म्हणजे कर्मचारी वर्गाचा भविष्य निर्वाह निधी. कोरोनामुळे ओढवलेल्या आर्थिक संकटामध्ये लोकांच्या हातात पैसा राहावा, यासाठी पीएफ खातेधारकांसाठी ही योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेनुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ खात्यामध्ये जमा रकमेच्या विशिष्ट रक्कम काढण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार गेल्या १० दिवसांमध्ये देशभरातल्या तब्बल १ लाख ३७ हजार कर्मचाऱ्यांच्या खात्यांमध्ये ईपीएफओने रक्कम ट्रान्सफर केली आहे. आणि या रकमेचा आकडा तब्बल २८० कोटींच्या घरात आहे!

काढलेल्या रकमेवर टॅक्स नाही!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत देशभरातल्या पीएफ खातेधारकांना त्यांच्या महिन्याभराचं वेतन किंवा पीएफ खात्यामध्ये जमा रकमेच्या ७५ टक्के रक्कम, यातली जी रक्कम कमी असेल, ती काढण्याची परवानगी असेल. ही रक्कम पुन्हा पीएफमध्ये भरण्याची आवश्यकता नसेल. या रकमेपेक्षाही कमी रक्कम हवी असल्यास खातेधारक तसा दावा करू शकतात. त्याशिवाय, या रकमेवर कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागणार नसल्याचं देखील आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

२८ मार्चला केली होती घोषणा!

दरम्यान, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आत्तापर्यंत लाखो खातेधारकांनी अर्ज दाखल केले आहेत त्यापैकी ज्यांचं केवायसी व्हेरीफिकेशन पूर्ण झालं आहे, अशा खातेधारकांच्या बँक खात्यांमध्ये नियमानुसार योग्य असलेली रक्कम वर्ग करण्यात आली आहे. तब्बल २८० कोटींची ही रक्कम आहे. या कामासाठी ईपीएफओ एक विशिष्ट प्रकारचं सॉफ्टवेअर वापरत असून त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळून ऑनलाईन व्यवहार करणं सोपं झालं आहे.

First Published on: April 10, 2020 9:13 PM
Exit mobile version