गुर्मी उतरली! भारताशी चर्चा करण्याचा माजी सैन्य अधिकाऱ्याचा पाकिस्तानला सल्ला

गुर्मी उतरली! भारताशी चर्चा करण्याचा माजी सैन्य अधिकाऱ्याचा पाकिस्तानला सल्ला

इस्लामाबाद : आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानची गुर्मी आता उतरली आहे. भारताबरोबर चर्चा करण्यासाठी आता केवळ गयावया करणेच बाकी होते. पाकिस्तानच्या एका माजी उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्याने पाकिस्तानने भारताशी चर्चा करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.

चौदाव्या कराची लिटरेचर फेस्टिव्हलच्या समारोपाच्या दिवशी मेजर जनरल (निवृत्त) अतहर अब्बास हे सहभागी झाले होते. इंटर सर्व्हिस पब्लिक रिलेशन्सचे (ISPR) माजी महासंचालक अतहर अब्बास म्हणाले की, आजच्या घडीला पाकिस्तानच्या दृष्टीने चर्चा करणे, ही गरज आहे. चर्चा पुढे नेणे, हे केवळ सरकार किंवा लष्कराचे काम नाही. कारण सर्व जबाबदारी त्यांच्यावर टाकली तर, स्थिती बदलणार नाही, असे सांगून ते म्हणाले, प्रसारमाध्यमे, व्यवसाय, व्यापार या माध्यमातून याची सुरुवात करता येईल. त्यामुळे भारतीय समाजात चर्चेसाठी पुरक असे वातावरण निर्माण होईल. परिणामी सरकारवर चर्चेसाठी दबाव निर्माण होईल. तसेच अमेरिका आणि युरोपियन युनियनचाही बाह्य दबाव निर्माण करता येईल.

भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चा सुरू करण्याच्या यापूर्वी अनेक संधी आल्या होत्या; पण त्या सर्व गमावल्या. भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे बसने लाहोरला आल्याचा आणि त्यानंतर पाकिस्तानचे माजी हुकूमशाह परवेझ मुशर्रफ आग्र्याला गेल्याचा उल्लेख त्यांनी केला. पाकिस्तानातील राजकीयदृष्ट्या अस्थिर परिस्थितीबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. जेव्हा तुम्ही आपापसात भांडत असाल तर, अशा वातावरणात चर्चा होऊ शकत नाही, असे त्यांनी नमूद केले.

पाकिस्तानातील अस्थिरता भारतासाठीही हानिकारक आहे. अशा स्थितीत केवळ सरकारनेच भारताशी चर्चा करण्याची वाट आपण करू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. सध्या पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत तेथील सैन्य असो की सरकार, प्रत्येकजण भारताशी चर्चा करण्यासाठी एकमुखी विनंती करत आहे. खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी चर्चेसाठी भारताला आवाहन केले असून भारताशी घेतलेल्या शत्रूत्वापासून पाकिस्तानने धडा घेतल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, ही भारताची भूमिका कायम आहे.

First Published on: February 20, 2023 10:47 AM
Exit mobile version