रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी २००८ मध्येच सोडली होती सरकारी नोकरी

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी २००८ मध्येच सोडली होती सरकारी नोकरी

मोदींच्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये तरूण आणि उच्च शिक्षित अशा नव्या चेहऱ्यांना पसंती देण्यात आली. तसेच सनदी अधिकाऱ्यांनाही यंदाच्या कॅबिनेट विस्तारामध्ये संधी देण्यात आली आहे. रेल्वेमंत्री म्हणून संधी मिळालेले अश्विनी वैष्णव हे १९९४ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. गेल्या १५ वर्षांमध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्यांवर काम केले आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये Public Private Partnership (PPP) फ्रेमवर्क म्हणजे सार्वजनिक खाजगी भागिदारी प्रकल्पांमध्ये त्यांच्या योगदानासाठी अश्विनी वैष्णव यांना ओळखले जाते. जागतिक पातळीवर महत्वाच्या अशा जनरल इलेक्ट्रिक आणि सिमेन्स यासारख्या कंपन्यांमध्ये महत्वाच्या पदावरही त्यांनी काम केले आहे. पेनिसिल्वेनिया विद्यापिठातील व्हॉरटन स्कूल येथून MBA ची पदवी त्यांनी घेतली आहे. तर आयआयटी कानपूर येथून त्यांनी MTech ची पदवी घेतली आहे. अश्विनी वैष्णव हे ओरिसा येथून राज्यसभेवर नेमले गेलेले खासदार आहेत. वैष्णव यांना माहिती आणि दूरसंचार विभागाचा कार्यभारही देण्यात आला आहे. अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी पार पडलेल्या शपथविधी समारंभात मंत्री पदाची शपथ घेतली. कॅबिनेट मंत्री पदी त्यांची वर्णी लागली असून त्यांना रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. दोन वर्षापूर्वीच त्यांची नेमणूक राज्यसभेवर खासदारकीसाठी झाली होती.

म्हणूनच मिळाले रेल्वेमंत्रीपद

राजस्थानच्या जोधपूर येथे अश्विनी वैष्णव यांचा जन्म झालेला आहे. सध्या ते ५१ वर्षांचे असून त्यांनी सनदी अधिकारी म्हणून १५ वर्षे सेवा दिली. पीपीपी फ्रेमवर्कच्या योगदानासाठी त्यांचे योगदान हे महत्वाचे मानले जाते. आयआयटी ग्रॅज्युएट असलेल्या वैष्णव यांनी २००८ मध्ये नोकरीचा राजीनामा देत अमेरिकेच्या वॉटर्न विद्यापिठात अधिक शिक्षणासाठी जाणे पसंत केले. त्याठिकाणी एमबीएचे शिक्षण घेतल्यानंतर अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांनी नोकरी केली. या नोकऱ्यांमध्ये मन न लागल्यानेच त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. भारतात येऊन त्यांनी गुजरातमध्ये मॅन्यूफॅक्चरींग युनिट उभारले. त्यांनी जनरल इलेक्ट्रिक आणि सिमेन्स यासारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांनी काम केले आहे.

भारतीय रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक योजना आणि पर्याय विचारात असतानाच त्यांना रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. रेल्वेच्या विकासामध्ये पीपीपी मॉडेलचा अधिक वापर करण्याच्या अनुषंगानेच यापुढच्या काळात पीपीपी प्रयोग होण्याची शक्यता आहे. भारतीय रेल्वेच्या योजनेनुसार येत्या दिवसांमध्ये भारतीय रेल्वे ही अनेक टप्प्यांमध्ये खाजगी ट्रेन लॉंच करणार आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात २०२३-२४ पर्यंत एक डझन खाजगी ट्रेन सुरू करण्याचा रेल्वेचा मानस आहे. तर २०२७ पर्यंत १५१ इतक्या खाजगी ट्रेन सुरू करण्याचा रेल्वेचा मानस आहे. आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये बॉम्बार्डियर ट्रान्सपोर्टेशन इंडिया, सिमेन्स इंडि.ा, ऑलस्ट्रॉम ट्रान्सपोर्ट, इंडिया लिमिटेड यासारख्या २३ कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी खाजगी ट्रेन चालवण्यासाठी सहभाग दाखवला आहे.

जिल्हाधिकारी असताना वाचवले अनेकजणांचे जीव

प्रशासकीय सेवेत असताना त्यांनी सुरूवातीला ओरिसातील बालेश्वर आणि कटक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर १९९९ साली आलेल्या मोठ्या चक्रीवादळात त्यांनी आपल्या प्रशासकीय सेवेतील कौशल्य आणि अनुभवाचा वापर करत अनेक उपाययोजना केल्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा जीव वाचवण्यात त्यांना यश आले. त्यांनी २००३ पर्यंत ओरिसामध्ये काम केले. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधान कार्यालयात त्यांची नियुक्ती उपसचिव म्हणून करण्यात आली. त्यानंतर सचिव पदीही त्यांना बढती मिळाली होती. पण २००८ मध्ये त्यांनी सरकारी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले. त्याठिकाणी एमबीएचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी काही कंपन्यांमध्ये काम करायला सुरूवात केली. पण त्यानंतर भारतात येऊन त्यांनी स्वतःची ऑटो उपकरणांची कंपनी सुरू केली.


 

First Published on: July 8, 2021 1:40 PM
Exit mobile version