भाजपशी लागेबांधे असल्याचा आरोप असणाऱ्या Facebook इंडियाच्या अंखी दास यांचा राजीनामा

भाजपशी लागेबांधे असल्याचा आरोप असणाऱ्या Facebook इंडियाच्या अंखी दास यांचा राजीनामा

भाजपशी लागेबांधे असल्याचा आरोप असलेल्या फेसबुक इंडियाच्या पॉलिसी हेड अंखी दास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अंखी दास यांचे भाजपशी संबंध आहेत आणि त्या पक्षपात करत आहेत, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर त्यांची संसदीय समितीने चौकशी केली होती.

काही दिवसांपूर्वी भारतात फेसबुकवर पक्षपाताचा आणि हिंसाचार पसरवणाऱ्या भाषणांवर कारवाई न करण्याचा आरोप झाला होता. या वरून फेसबुक इंडियाच्या पॉलिसी हेड अंखी दास यांना लक्ष्य करण्यात आलं. त्यांच्यावर भाजपशी लागेबांधे असल्याचाही आरोप करण्यात आला. दरम्यान, त्यांची फेसबुक आणि सरकारने चौकशी केली. या चौकशीनंतर एक आठवड्याने अंखी दास यांनी राजीनामा दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर राजकीय पोस्टचं नियंत्रण कशाप्रकारे होते यावरुन फेसबुकवर काँग्रेससह विरोधी पक्षांनी गंभीर आरोप केले आहेत.

अंखी दास यांची डाटा प्रायव्हसीच्या मुद्द्यावर संसदीय समितीने गेल्या आठवड्यात चौकशी केली होती. जवळपास २ तास त्यांची ओळख कसून चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, ऑगस्टमध्ये अमेरिकेच्या एका प्रतिष्ठित वृत्तपत्राने अंखी दास यांनी सत्ताधारी भाजपच्या नेत्यांच्या हिंसाचार पसरवणाऱ्या भाषणांवर कारवाई न केल्याचं वृत्त प्रकाशित केलं होतं. या बातमीचे भारतात तीव्र पडसाद उमटले. अंखी दास आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात आली. अंखी दास यांची चौकशी करण्यात आली. संसदीय समितीसमोर चौकशीसाठी हजर होताना अंखी दास एकट्या हजर झाल्या नव्हत्या. तर त्यांच्यासोबत त्यावेळी कंपनीचे बिजनेस प्रमुख अजीत मोहनही होते.

First Published on: October 27, 2020 10:59 PM
Exit mobile version