दिल्ली सीमेवरील खिळ्यांचा वेढा भारत-चीन सीमेवर हवा होता; राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल

दिल्ली सीमेवरील खिळ्यांचा वेढा भारत-चीन सीमेवर हवा होता; राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल

संजय राऊत आज गाझीपूर बॉर्डरवरील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जाणार

शिवसेनेचे खासदार, प्रवक्ते आणि नेते संजय राऊत आज गाझीपुर सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. मात्र, दिल्ली सीमांना लष्करी छावणीचं स्वरुप आलं आहे. सिमेंटच्या स्लॅबवर उलटे खिळे लावले आहेत. यावरुन संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. दिल्ली सीमेवरील खिळ्यांचा वेढा भारत-चीन सीमेवर हवा होता. भारत-चीन सीमेवर खिळे लावले असते तर चिनी सैन्य भारतात घुसलं नसतं, असा टोला संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.

मुख्यमंत्री आणि शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरुन आज गाझीपुर सीमेवर शेतकऱ्यांना भेटायला जाणार आहोत असं संजय राऊत यांनी सांगितलं. त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्रावर टीकास्त्र डागलं. “दिल्ली सीमेवरील खिळ्यांचा वेढा भारत-चीन सीमेवर हवा होता. भारत-चीन सीमेवर खिळे लावले असते तर चिनी सैन्य भारतात घुसलं नसतं,” असा टोला राऊतांनी लगावला. “माझ्या बरोबर खासदार विनायक राऊत, अनिल परब तसंच अन्य पाच सदस्यांसह शेतकऱ्यांची भेट घेणार आहोत. शेतकऱ्यांचं मन समजून घेऊ, आमच्या भावना व्यक्त करु,” असं संजय राऊत म्हणाले. “आम्ही दिल्लीला आल्यावर त्या शेतकऱ्यांना भेटलो नाही तर आम्हाला परमेश्वर माफ करणार नाही,” अशी भावना देखील राऊतांनी व्यक्त केली.

भेटण्यासाठी परवानगी नाही पण…

दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांना भेटण्यासाठी परवानगी दिली जात नाही आहे. कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, आंदोलकांच्या भेटीसाठी परवानगी नाही पण घाबरत नाही. “आमच्या सारख्या लोकांना भेटण्यासाठी परवानगी कशाला हवी होती. आम्हाला अडवतील अडवू दे. आम्हाला तिथं जाऊन धडकणं महत्त्वाचं आहे. अडवलं तरी हरकत नाही. शेतकऱ्यांची इच्छा आम्ही तिथं यावं. तिथल्या काही प्रमुख लोकांशी रात्री चर्चा झाली. अडवलं तर बघून घेऊ. अटक केली तरी हरकत नाही. लाठ्या चालवल्या तरी हरकचत नाही. कारण शेतकरी तिथं बसला आहे तो आमच्यासाठी बसला आहे. राकेश टीकैत आणि शेतकऱ्यांशी महाराष्ट्राचा पाठिंबा आहे. त्यांना नैतिक पाठबळ देणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

 

First Published on: February 2, 2021 12:15 PM
Exit mobile version