नारी शक्तीचा विजय असो! महिला वैमानिकाने उडवले लढाऊ विमान; भारत-चीन सीमेवर यशस्वी उड्डाण

नारी शक्तीचा विजय असो! महिला वैमानिकाने उडवले लढाऊ विमान; भारत-चीन सीमेवर यशस्वी उड्डाण

नवी दिल्ली – नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने सगळीकडे यशस्वी, क्रांतीकारी महिलांच्या यशोगाथा प्रसिद्ध होत असताना संरक्षण क्षेत्रातूनही एक आनंदाची आणि अभिमानाची बातमी समोर येत आहे. पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत मंगळवारी सुखोई-३० लढाऊ विमानाचं महिला वैमानिकाने उड्डाण केलं. आसाममधील भारत-चीन सीमेवर तेजपूर येथील पूर्व सेक्टरमधील फॉरवर्ड बेसवरून सुखोई ३० विमानानं उड्डाण घेतलं. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फ्लाईट लेफ्टनंट तेजस्वी यांनी वेपन सिस्टम ऑपरेटिंग केलं आहे. वेपन सिस्टम ऑपरेटिंग करणाऱ्या तेजस्वी या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

वेपन ऑपरेटर फ्लाइट लेफ्टनंट तेजस्वी म्हणाल्या की, ‘काही हुशार महिलांनी पारंपारिक मर्यादा तोडल्यामुळे आम्ही आमची स्वप्ने पूर्ण करू शकतो. त्यामुळे आम्ही आता स्वच्छंदी झालो आहोत. महिलांनी फायटर जेट उडवणं नवीन गोष्ट नाही. हवाई दलात प्रत्येक पुरुष आणि महिला समान कठोर परिश्रम करत असतो आणि त्यांना समान प्रशिक्षण दिलं जातं. आम्ही येथे समान पातळीवर काम करतो. त्यामुळे पूर्वेकडील क्षेत्रात आमचे पायलट कोणत्याही प्रसंगाला प्रत्युत्तर देण्यास तयार आहेत.’

देशातील सर्वात उच्च युद्धक्षेत्र सियाचिन, अरुणाचल प्रदेशमधील उंच पर्वतरांगा असो भारतीय वायुसेनेतील महिला पायलट प्रत्येक ठिकाणी आपली शक्ती दाखवत आहेत. भारतीय वायुसेनेत सध्या १३०० महिला अधिकारी ग्राऊंड आणि हवाई कर्तव्यावर आहेत. भारतीय वायुसेनेने तीन महिलांना फायटर स्ट्रीममध्ये सामील करून घेतलं आहे. अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि शिवांगी सिंह यांचा यात समावेश आहे. शिवांगी सिंह या राफेल फायटर जेटच्या पायलट बनल्या आहेत.

फ्लाइट लेफ्टनंट अनी अवस्थी आणि ए नैन अरुणाचल प्रदेशातील चीन सीमेजवळील LAC च्या आजूबाजूच्या घनदाट जंगलात ALH हेलिकॉप्टर उडवत आहेत. भारतीय सैन्यात स्त्री शक्तीला पुढे आणण्याकरता सरकारकडून योजना राबवल्या जात आहेत. तसंच, अग्नीवीर योजनेतूनही महिलांची भरती करण्यात येणार आहे. भारतीय वायुसेनेत प्रत्येक पायलट प्रशिक्षित असतो. आम्हाला पूर्व आणि उत्तर पूर्व भागात तैनात केलं जातं. प्रत्येक आव्हानांसाठी आम्ही सदैव तत्पर असतो, असं तेजस्वी म्हणाल्या.

First Published on: September 28, 2022 10:41 AM
Exit mobile version