अजबच! या मादी गिधाड नरांशिवाय देत आहेत पिल्लांना जन्म

एकीकडे जगभरात गिधाडांची संख्या कमी होत असून या दुर्मिळ पक्षाच्या प्रजातीही लुप्त होत आहेत. यामुळे गिधाडांची संख्या कशी वाढवता येईल यावर संशोधक संशोधन करत असतानाच मादी गिधांडांबदद्ल अचंबित करणारी माहीती समोर आली आहे. जर्नल ऑफ हेरेडीटीमध्ये यावरील लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे.

अमेरिकेत संशोधनादरम्यान  कॅलिफोर्निया कंडर प्रजातीच्या अशा काही मादी गिधाड आढळल्या ज्या नर गिधांडांबरोबर संभोग न करताही पिल्लांना जन्माला घालत आहेत. या घटनेमुळे संशोधकही हैराण झाले असून माद्यांचे अशा प्रकारे पिल्लांना जन्म घालणे हे अनैसर्गिक असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

 

गेल्या ३९ वर्षांपासून जगभरातील संशोधक गिधाडांच्या प्रजाती वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. १९८२ साली अमेरिकेत अवघी २२ गिधाड होती. यामुळे त्यांच्या संवर्धनावर काम करण्यात आले. त्यानंतर २०१९ मध्ये गिधाडांची संख्या ५०० वर गेली.

यादरम्यान, कॅलिफोर्निया कंडर या प्रजातीच्या गिधाडांमध्ये इतर गिधाडांच्या प्रजातीपेक्षा सुदृढ पिल्लांना जन्म घालण्याची क्षमता अधिक असल्याचे संशोधकांना आढळले. त्यासाठी या गिधांडाच्या जेनेटीक डेटाचा अभ्यास करण्यात आला. त्यात SB260 आणि SB517 ही दोन नर गिधाड अशी आढळली ज्यांचे गुणसूत्र तेथे असलेल्या कोणत्याही पिल्लांशी जुळत नव्हते. पण या गिधाडांबरोबर राहणाऱ्या मादी गिधाड मात्र पिल्लांना जन्म घालत होत्या. वैद्यकिय भाषेत या प्रक्रियेला फॅक्लटेटिव पार्थोजेनेसिस (Facultativ Parthogenesis)असे म्हणतात. याचा अर्थ वर्जिन बर्थ. म्हणजेच नराशी शारिरीक संबंध न ठेवताही माद्यांनी पिल्लांना जन्म देणे.

 

अशा प्रकारे माद्यांनी पिल्लांना जन्म घालण्याच्या प्रक्रियेला एसॅक्सुअल रिप्रॉडक्शन (Asexual Reproduction) असेही म्हणतात. ही प्रक्रिया अशा काही विशिष्ट प्राणी किंवा पक्ष्यांमध्ये होते ज्यांच्या मादीच्या शरीरात काही खास पेशी असतात. मादीच्या शरीरात या पेशी नर वीर्याचे काम करतात. प्रामुख्याने शार्क, रे आणि पालीच्या काही प्रजातीमध्ये अशी प्रक्रिया आढळते.

तसेच टर्की, कोंबडी आणि चीनमध्ये आढळणाऱ्या पेटेंड क्वेल या पक्षांमध्येही नराशी मिलन न करताही माद्या पिल्लांना जन्म घालतात. पण गिधाडांमध्ये मात्र हे पहील्यांदाच आढळलं आहे.

याबदद्ल मिसिसिपी स्टेट युनिवर्सिटीच्या रिप्रोडक्टिव फिजियोलॉजिस्ट आणि मायक्रो बायोलॉजिस्ट रेशमा रामचंद्रन यांनी सांगितले की कॅलिफोर्निया कंडर या गिधाडांची संख्या ३०० एवढी आहे. यामुळे लोप पावत चाललेल्या या गिधाडांच्या माद्या आता वर्जिन बर्थ प्रक्रिया करूनच प्रजातीला वाचवत आहेत.

First Published on: November 3, 2021 2:15 PM
Exit mobile version