Firing in Jammu Kashmir: पूॅंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; एक जवान हुतात्मा, 4 जखमी

Firing in Jammu Kashmir: पूॅंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; एक जवान हुतात्मा, 4 जखमी

जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये शनिवारी संध्याकाळी हवाई दलाच्या वाहनांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला

पूंछ: जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये शनिवारी संध्याकाळी हवाई दलाच्या वाहनांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 5 जवान जखमी झाले. सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान हवाई दलाचा एक जवान हुतात्मा झाला. तर दुसऱ्या जवानाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत, तर तीन जवानांची प्रकृती स्थिर आहे. (Firing in Jammu Kashmir Terrorist attack on Air Force convoy in Poonch 1 jawan killed 4 injured)

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर गोळीबार केला होता, दहशतवाद्यांनी हा हल्ला सुरनकोटच्या सनई गावात केला. मात्र, भारतीय लष्कर आणि पोलिसांचा अतिरिक्त ताफा घटनास्थळी पाठवण्यात आला आहे. राष्ट्रीय रायफल्स युनिटच्या स्थानिक तुकडीने परिसराची नाकेबंदी करून शोध मोहीम सुरू केली आहे. त्याचवेळी हवाई दलाची वाहने शाहसीतारजवळील एअरबेसच्या आत सुरक्षितपणे पोहोचवण्यात आली आहेत.

घटनास्थळी भारतीय हवाई दलाचे गरुड विशेष दलही तैनात करण्यात आले आहे. या घटनेत सहभागी असलेल्या दहशतवाद्यांविरोधात लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे जवान शोध मोहिमेत गुंतले आहेत.

जखमी सैनिकांना एअरलिफ्ट करण्यात आलं

सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात 5 जवान जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ एअरलिफ्ट करून उधमपूर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. जिथे उपचारादरम्यान एक जवान हुतात्मा झाले. हवाई दलाच्या वाहनांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची छायाचित्रेही समोर आली आहेत. यामध्ये हवाई दलाच्या वाहनावर गोळ्यांच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत.

परिसरात नाकाबंदी आणि शोधमोहीम सुरू

हवाई दलाने सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील पुंछमधील शाहसीतारजवळ दहशतवाद्यांनी भारतीय हवाई दलाच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला केला. स्थानिक लष्करी तुकड्यांकडून परिसराची घेराबंदी आणि शोध मोहीम राबवली जात आहे. पुढील तपास सुरू आहे.

दहशतवादी हल्ला अत्यंत लज्जास्पद : राहुल गांधी

पुंछमधील दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये आमच्या लष्कराच्या ताफ्यावर झालेला भ्याड आणि धाडसी दहशतवादी हल्ला अत्यंत लज्जास्पद आणि दुःखद आहे. हुतात्मा झालेल्या सैनिकाला मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्या शोकाकुल कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी आशा करतो.

खर्गे म्हणाले – दहशतवादाविरोधात संपूर्ण देश

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे भारतीय हवाई दलाच्या वाहनावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे मला खूप दुःख झाले आहे. या क्रूर दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. दहशतवादाविरोधात संपूर्ण देश सोबत उभा आहे. ते म्हणाले की, सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या शूर योद्ध्याच्या कुटुंबीयांप्रती आमची तीव्र संवेदना आहे. जखमी सैनिक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी आशा आहे.

 

First Published on: May 5, 2024 10:41 AM
Exit mobile version