TikTok बनवणे पडले महागात; वाराणसीत पाच तरुण बुडाले

TikTok बनवणे पडले महागात; वाराणसीत पाच तरुण बुडाले

तरुणांवर टिकटॉक व्हिडिओ बनवण्याचे वेड दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मात्र अनेकदा हे व्हिडिओ बनवण्याच्या नादात युवकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. नुकतेच वाराणसीमध्ये टिकटॉक व्हिडिओ बनवण्याच्या नादात पाच तरुणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी वाराणसीतील गंगा नदीत टिकटॉक व्हिडिओ बनवताना पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. बुडणाऱ्या तरुणांना वाचवण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनी नदीकडे धाव घेतली. मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

हेही वाचा – भरमसाठ बिल उकळण्याऱ्या मुंबऱ्यातील तीन खाजगी रुग्णालयांवर गुन्हा दाखल

काय आहे घटना 

तब्बल दोन तासांच्या शोधानंतर या पाच तरुणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. हे मृतदेह रामनगर येथील लाल बहाद्दुर शास्त्री हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. एकाच वेळी एकाच परिसरातील पाच मुलांच्या मृत्युने या ठिकाणी शोकाकुल वातावरण बनले आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एसडीएम, सिटी मॅजिस्ट्रेटसह सर्व अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली आहे. गंगा नदीच्या पलीकडे वसलेल्या रामनगर वारीगडमधील पाच किशोर वयातील मुलं तौसिफ (वय १९), फरदीन (वय १४), सैफ (वय १५), रिझवान (वय १५) आणि सकी (वय १४) सह सात तरुण शुक्रवारी सकाळी साधारण ८ वाजण्याच्या सुमारास टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी गंगाकिनारे पोहोचले होते. रविदास पार्क आणि रामनगरच्या सिपहिया घाटाच्या मधोमध असलेल्या गंगा नदीला उधाण आलेले असते. त्या सात जणांपैकी दोघे नदीच्या किनाऱ्यावर बसले होते. तर तौसिफ, फरदीन, सैफ, रिझवान आणि सकी हे टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी गंगा नदीच्या रेतीपर्यंत पोहोचले. व्हिडिओ बनवण्याच्या नादात त्यातील एक जण पाण्यात पडला आणि बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याने पाण्यात उडी घेतली. असे करत करत सगळेचे एकमेकांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरले आणि बुडाले.

First Published on: May 29, 2020 9:49 PM
Exit mobile version