माजी न्या. पिनाकी चंद्र घोष देशाचे पहिले लोकपाल

माजी न्या. पिनाकी चंद्र घोष देशाचे पहिले लोकपाल

Pinaki Chandra Ghose

सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष हे देशाचे पहिले लोकपाल असतील, अशी घोषणा केंद्र सरकारने रविवारी केली. न्या. घोष हे मे, २०१७ मध्ये सुप्रीम कोर्टातून निवृत्त झाले. सध्या ते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आहेत. त्यांचा जन्म २८ मे १९५२ साली एका वकील कुटुंबात झाला. न्या. पिनाकी यांचा मुलगा स्व. न्या. संभू चंद्र घोष हे कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश होते. पिनाकी यांना १७ जुलै १९९७ रोजी कोलकाता उच्च न्यायालयाचे कायम स्वरुपी न्यायमूर्ती म्हणून बढती मिळाली.

लोकपाल समितीच्या नियुक्तीसाठी, नियुक्ती समितीची बैठकीची संभाव्य तारीख दहा दिवसांत निश्चित करा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने ७ मार्च रोजी केंद्र सरकारला दिले होते. लोकपाल समितीत अध्यक्ष, एक माजी न्यायमूर्ती आणि एक गैरन्यायालयीन सदस्याचा समावेश असणार आहे.

ही समिती भ्रष्टाचारावर नजर ठेवणार आहे. लोकपाल राष्ट्रीय स्तरावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करेल, तर लोकायुक्त हे राज्यस्तरीय भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी जबाबदार असणार आहेत. देशपातळीवरील लोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचार्‍यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी लोकपालांची नियुक्ती करावी, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली होती. या मागणीसाठी त्यांनी उपोषणही केले होते.

First Published on: March 18, 2019 5:55 AM
Exit mobile version