माजी पंतप्रधान वाजपेयींचा पहिला स्मृतिदिन; मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

माजी पंतप्रधान वाजपेयींचा पहिला स्मृतिदिन; मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेता अटल बिहारी वाजपेयी यांचा आज पहिला स्मृतिदिन आहे. देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. नवी दिल्ली येथील अटल बिहारी वाजपेयी यांच्या ‘सदैव अटल’ स्मृती स्थळावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मान्यवरांनी अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांची मुलगी नमिता कौल भट्टाचार्य, नात निहारिकासह अन्य कुटुंबियांनीही माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली.

१६ ऑगस्ट २०१८ रोजी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वाजपेयी यांना किडनी संसर्गासह मूत्रसंसर्ग, छातीदुखी, मधुमेह यासारख्या आजारांनी ग्रासलं होतं.

दिल्लीत असणाऱ्या ‘सदैव अटल’ स्मृती स्थळावर आजच्या दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अटल बिहारी वाजपेयींची मुलगी नमिता कौल भट्टाचार्य, नात निहारिकासह परिवारातील काही सदस्य देखील तेथे पोहचले होते.

उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी देखील ट्विटर अकाऊंटवर अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची कारकीर्द

१९९६मध्ये अटल बिहारी वाजपेयी भारताचे पहिल्यांदा पंतप्रधान बनले होते. पण केवळ १३ दिवसातच त्यांचे सरकार कोसळले. त्यानंतर १९९८ मध्ये वाजपेयी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाले. यावेळीही अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार १३ महिनेच चालले. त्यानंतर १९९९ मध्ये अटल बिहारी वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. यावेळी मात्र त्यांनी ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. मोदी सरकारने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना २०१४ मध्ये देशातील सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.

First Published on: August 16, 2019 8:40 AM
Exit mobile version