गार्गी कॉलेजमध्ये अनेक मुलींचा एकाच वेळी विनयभंग!

गार्गी कॉलेजमध्ये अनेक मुलींचा एकाच वेळी विनयभंग!

एकीकडे महाराष्ट्रात हिंगणघाट पीडितेच्या संतापजनक घटनेवर गंभीर चर्चा सुरू असताना दुसरीकडे दिल्लीमध्ये एकाच वेळी अनेक मुलींचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गंभीर बाब म्हणजे हा प्रकार शिक्षणाचं काम करत असलेल्या गार्गी कॉलेजमध्ये घडला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली असून आयोगाच्या दोन सदस्यीय पथकाने कॉलेजमध्ये जाऊन या सर्व प्रकाराची पाहाणी केली आहे. दरम्यान, कॉलेजमधल्या अनेक विद्यार्थिनींनी सोशल मीडियावर आपली आपबीती शेअर केल्यामुळे हा प्रकार उजेडात आला आहे.

नक्की झालं काय?

यासंदर्भात कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनुसार, ६ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या गार्गी या मुलींच्या कॉलेजमध्ये रिवेरी नावाचा फेस्टिव्हल होता. यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी जमा झाल्या होत्या. मात्र, त्याचवेळी तिथे बाहेरच्या मुलांचा एक मोठा गट दाखल झाला. या मुलांनी अर्वाच्च्य भाषेत संवाद सुरू केला. अश्लील शेरेबाजी केली. यातल्या काही मुलांनी कपडे देखील घातले नव्हते. तसेच, त्यांच्यातले काही जण गांजा ओढत होते. काही मुलींना चुकीचा स्पर्श करून त्यांचा विनयभंग करण्याचा मुलांनी प्रयत्न केला. काही विद्यार्थ्यांनी या मुलांनी मुलींकडे पाहून हस्तमैथुन केल्याचा देखील आरोप केला आहे.

प्रकरणाचे पडसाद लोकसभेत

दरम्यान, या सगळ्या प्रकारामुळे दिल्लीत वातावरण तापलं असून त्याचे पडसाद लोकसभेमध्ये देखील उमटले. यासंदर्भात कॉलेज प्रशासनाला लक्ष घालण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली. या सर्व प्रकाराबद्दल गार्गी कॉलेजच्या प्राचार्या प्रॉमिला कुमार यांनी माफी मागितली आहे.

सीसीटीव्ही फूटेजची तपासणी

या प्रकाराची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी तातडीने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. हा प्रकार घडला, तिथलं सीसीटीव्ही फूटेज तपासलं जात आहे. मात्र, अजब गोष्ट अशी की या प्रकरणात अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही अशी माहिती साऊथ झोनचे पोलीस उपायुक्त अतुल ठाकूर यांनी एएनआयला दिली आहे.


हेही वाचा – हिंगणघाट प्रकरणी मनसेच्या शालिनी ठाकरे यांचं भावनिक पत्र
First Published on: February 10, 2020 6:39 PM
Exit mobile version