‘खरेदीनंतर कोरोना झाला तर ५० हजारांचे कॅशबॅक’, अजब जाहीरातीनंतर दुकानावर गुन्हा दाखल

‘खरेदीनंतर कोरोना झाला तर ५० हजारांचे कॅशबॅक’, अजब जाहीरातीनंतर दुकानावर गुन्हा दाखल

इलेक्ट्रॉनिक दुकानाची वादग्रस्त जाहीरात

भारतात ज्या राज्यात सर्वात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता त्या केरळमध्ये आता कोरोनाबाधितांची संख्या ४८ हजारांपर्यंत पोहोचली आहे. कोरोना अजून पुर्णपणे गेलेला नसताना केरळमधील एका इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानदाराने एक भलतीच जाहीरात केली ज्यामुळे दुकानदार अडचणीत सापडला. ‘दुकानातून कोणतीही वस्तू खरेदी करा आणि २४ तासांत जर तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झाला तर त्यानंतर दुकानातील कोणत्याही वस्तूच्या खरेदीवर ५० हजारांची सूट मिळवा’, अशी जाहीरात दुकानदाराने केली होती.

ही जाहीरात केरळमधील काही प्रमुख वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली. ५० हजारांच्या खरेदीवर कोणताही जीएसटी लागणार नसल्याचेही या जाहीरातीत म्हटले होते. ही जाहीरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दुकानात एकच गर्दी उसळली. या गर्दीमुळे नको तो धोका उत्पन्न संभव होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आता या दुकानाविरोधात कारवाई केली आहे.

ही ऑफर १५ ऑगस्टपासून ते ३० ऑगस्टपर्यंत सुरु राहणार होती. वर्तमानपत्रासहीत टीव्ही आणि डिजिटल मीडियावर देखील जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. संभाव्य धोका ओळखून कोट्टयाम येथील एका वकिलाने थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही जाहीरात करणाऱ्यावर फौजदारी करावाई करावी, अशी मागणी केली. “कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या लोकांना खरेदीसाठी उद्युक्त करणारी ही जाहीरात आहे”, असेही या पत्रात नमूद करण्यात आले होते. जर असे झाले तर दुकानात येणाऱ्या इतरांना देखील त्याचा संसर्ग होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली.

अनलॉक ३ ची घोषणा करण्यात आल्यानंतर केरळमधील दुकानांत २० ग्राहकांना खरेदीसाठी एकाचवेळी येण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी या जाहीरातीची तात्काळ दखल घेत, सदर दुकानालाच टाळे ठोकण्याचे आदेश दिले.

First Published on: August 19, 2020 1:42 PM
Exit mobile version