बलात्कार करुन मुलीला गाडले, शेल्टर होममधील धक्कादायक प्रकार

बलात्कार करुन मुलीला गाडले, शेल्टर होममधील धक्कादायक प्रकार

मुलीला काढण्यासाठी जेसीबीने खणण्यास सुरुवात (सौजन्य-इंडिया टुडे)

बलात्काराच्या घटना देशात घडणे ही शरमेची बाब असताना आता शेल्टर होम देखील सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. बिहारमधील मुझ्झफरपूरमधील सेवा संकल्प एवं विकास समितीच्या शेल्टर होममध्ये मुलींवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महत्त्वाचे म्हणजे यातील एका मुलीवर बलात्कार करुन तिला शेल्टर होममधील परीसरात गाडण्यात आले, असा आरोप शेल्टर होममधील अन्य मुलींनी केला आहे. त्यामुळे आता या मुलीला शोधण्यासाठी जेसीबीने खोदकाम करायला सुरुवात केली आहे.

नेमके प्रकरण काय?

मुझ्झफरपूरमधील शेल्टर होममधील मुलींसोबत लैंगिक अत्याचार केले जातात, अशी माहिती मुंबईच्या टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सच्या एका अहवालातून समोर आली होती. येथील मुलींशी संवाद साधल्यानंतर शेल्टर होम मधील धक्कादायक वास्तव समोर आले होते. काही आठव़ड्यांपूर्वी येथील एका मुलीने बलात्कार झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर हे शेल्टर होम प्रकाशझोतात आले होते. महिन्याभरासाठी हे शेल्टर होम सीलदेखील करण्यात आले आणि येथील २१ मुलींची सुटका करण्यात आली. त्यांची आरोग्य चाचणी केल्यानंतर आता २१ पैकी १६ मुलींवर बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले आहे. तर आणखी ८ मुलींच्या वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक हरप्रीत कौर यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

रोज मारले जायचे!

चौकशीत शेल्टर होममधील सगळा प्रकार हळूहळू समोर येऊ लागला आहे. येथील मुलींना शरीरसंबंधासाठी शेल्टर होमच्या कर्मचाऱ्यांकडून मारहाण केली जायची, असे येथील मुलींनी सांगितले आहे. तर एका मुलीवर बलात्कार करुन तिला मारहाण करण्यात आली. यात तिचा मृत्यू झाला त्यानंतर तिला गाडण्यात आले असा आरोप येथील मुलींनी केला आहे. त्यानुसार आता या मुलीचा तपास पोलीस करत आहे. शिवाय आता ८ मुलींच्या वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा आहे.

शेल्टर होम चालकांना अटक

बिहार राज्यसरकारचे हे शेल्टर होम असून ब्रिजेश ठाकूर आणि विनीत कुमार हे दोघे शेल्टर होम चालवतात. या घटनेनंतर तातडीने या दोघांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय या शेल्टर होममधील महिला कर्मचारी आणि चाईल्ड वेल्फेअर कमिटीच्या कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे.

First Published on: July 23, 2018 7:01 PM
Exit mobile version