२००५ नंतर जन्मलेल्या मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान हक्क

२००५ नंतर जन्मलेल्या मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान हक्क

वडिलांच्या संपत्तीत मुलीला मुलाप्रमाणेच समान वाटा दिला जावा, असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. १९५६ मधील हिंदू वारसा हक्क कायद्यात २००५ मध्ये सुधारणा करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना कायद्यात सुधारणा करण्यात आली त्यावेळी मुलीचा जन्म झाला नसेल तरी तिला संपत्तीत समान हक्क मिळणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच कायद्यात सुधारणा करण्यात आली तेव्हा वडील हयात असतील किंवा नसले तरी मुलीला संपत्तीमधील समान हक्क मिळणार असल्याचेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.

सुप्रीम कोर्टाने निकाल देताना २००५ मधील कायद्यातील सुधारणांमुळे मुलींना संपत्तीत समान हक्क मिळण्यात अडथळा निर्माण होईल हा दावा फेटाळला आहे. कायद्यात सुधारणा करण्यात आल्यानंतर म्हणजेच २००५ नंतर मुलींचा जन्म झाला असेल तरी त्यांना या कायद्यांतर्गत संपत्तीत समान हक्क मिळणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा, एस. अब्दुल नजीर आणि एम. आर. शाह यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. संपत्तीत मुलगा आणि मुलगी दोघांनाही समान हक्क मिळण्यासंबंधी सांगताना न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी म्हटले की, मुलाप्रमाणे मुलींनाही संपत्तीत समान हक्क दिला पाहिजे.

हिंदू वारसा कायद्याच्या कलम ६ मध्ये ९ सप्टेंबर २००५ मध्ये महत्त्वाची आणि दूरगामी परिणाम करणारी दुरुस्ती केंद्र शासनाकडून करण्यात आली. वडिलोपार्जित संपत्तीत (स्थावर मालमत्तेतही) मुलांच्या बरोबरीनेच मुलींना देखील जन्मत:च सह हिस्सेदार म्हणून हक्क प्राप्त करून देण्याबाबतची ही दुरुस्ती आहे. सुप्रीम कोर्टात मुलीचा जन्म २००५ नंतर म्हणजेच कायद्यात सुधारणा करण्यात आल्यानंतर झाला असेल तर तिला संपत्तीत समान हक्क नाकारला जाऊ शकतो का? अशी शंका उपस्थित करणारी याचिका करण्यात आली होती.

First Published on: August 12, 2020 7:18 AM
Exit mobile version