सोने@52000; 4 हजारांनी गडगडले

सोने@52000; 4 हजारांनी गडगडले

जनता कर्फ्यूचा सोने व्यवसायाला मोठा फटका, दोन दिवसात १२५ कोटींचा व्यवसाय ठप्प

सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. या 7 ऑगस्टच्या प्रतितोळा 56 हजार 200 रुपयांच्या दरावरुन सोन्याचा दर 52 हजारांवर आला आहे. म्हणजेच सोन्याच्या दरात 4 हजारपेक्षा अधिकची घट झाली आहे. या आठवड्यात सोने-चांदीचे दर जवळपास स्थिर होते. आठवड्याच्या सुरुवातीलाच 17 ऑगस्टला सोन्याचे दर 52 हजार 151 रुपये प्रति तोळा होते. तर चांदीचे दर 67 हजार 106 रुपये प्रति किलो इतके होते. मात्र, शुक्रवारी (21 ऑगस्ट) या दरात 0.29 टक्क्यांची घसरण होऊन प्रतितोळे दर 52,001 वर स्थिर झाले.

चांदीच्या दरातही 0.95 टक्क्यांची घसरण होऊन हा दर प्रति किलो 66,954 रुपयांवर स्थिर झाला. जागतिक पातळीवरील किमतीचा विचार करता सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर सोन्याचा दर 0.50 डॉलरच्या वाढीसह प्रति औंस (28.35 ग्रॅम) 1 हजार 947 डॉलर झाला आहे. याचप्रमाणे चांदीच्या जागतिक बाजारातील भावातही घसरण पाहायला मिळाली. चांदीच्या दरात 1.55 टक्के घट झाली. चांदीचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात 26.88 डॉलर प्रति औंस (28.35 ग्रॅम) इतके झाले.

जागतिक बाजारात डॉलरचे मजबूत पुनरागमन झाले आणि अमेरिकेतील व्यापारातही सुधारणा झाली. त्यामुळे सोन्याच्या मागणीत काहीशी घट पाहायला मिळाली. मात्र, दीर्घकालीन दृष्टीने पाहिलं तर सोन्याच्या दरातील वाढ कायम आहे, असे मत विश्लेषक व्यक्त करत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली होती. ग्राहक येत नसल्यामुळे व्यापार्‍यांनाही तोटा सहन करावा लागत होता; पण आता सोन्याच्या दरात घट झाल्यामुळे नागरिकांना थोडा फार दिलासा मिळाला आहे.

First Published on: August 24, 2020 1:07 AM
Exit mobile version