गुगल भारतात करणार ७५ हजार कोटींची गुंतवणूक

गुगल भारतात करणार ७५ हजार कोटींची गुंतवणूक

गूगल सीईओ सुंदर पिचाई

गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी गुगल भारतामध्ये डिजिटलायझेशनसाठी 75 हजार कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. पुढील पाच ते सात वर्षांमध्ये ही गुंतवणूक केली जाणार असल्याचे पिचई यांनी स्पष्ट केले आहे. पिचई यांनी सोमवारी सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. त्यानंतर पिचई यांनी एका ब्लॉग पोस्टमधून ही घोषणा केली आहे.

आम्ही आज गुगल फॉर इंडिया मोहिमेअंतर्गत 10 बिलियन डॉलरच्या (75 हजार कोटी) गुंतवणुकीची घोषणा केली. भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आम्ही ही घोषणा करत आहोत. आम्हाला यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजिटल इंडियाच्या व्हिजनमुळे पाठिंबा मिळाला त्यासाठी त्यांचे धन्यवाद. त्याचप्रमाणे मंत्री रवीशंकर प्रसाद आणि मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांचेही आभार, असे ट्विट पिचई यांनी केले आहे.

भारतामध्ये वेगवेगळे प्रयोग सुरु असून त्याचा इतर जगालाही फायदा होऊ शकतो. मात्र भारताचा डिजिटल प्रवास अद्यापही सुरुच आहे. अजूनही भारतामधील लाखो लोकं स्वस्त इंटरनेटच्या सेवेपासून दूर आहेत. सर्वांसाठी व्हॉइस इनपूटची सेवा उपलब्ध करुन देण्यापासून ते सर्व भारतीय भाषांमध्ये कॉम्प्युटिंगचा पर्याय उपलब्ध करुन देण्यापर्यंत अनेक कामे बाकी आहेत. नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी याची गरज आहे. म्हणून आम्ही मागील काही वर्षांपासून वेगवगेळ्या माध्यमातून भारतामध्ये गुंतवणूक केली आहे, असे पिचई आपल्या ब्लॉगमध्ये म्हणाले आहेत.

आज भारतामधील सोयी-सुविधांचा दर्जा वाढवण्यासाठी डिजिटलायझेशन फंडची घोषणा करताना मला आनंद होत आहे. आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून पुढील पाच ते सात वर्षांमध्ये भारतात 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहोत. आम्ही इक्विटीच्या माध्यमातून, भागिदारीमधून तसेच ऑप्रेशनल क्षेत्रामधून गुंतवणूक करणार आहोत. याच प्रमाणे डिजिटलायझेशनसंदर्भातील बांधकाम आणि इकोसिस्टीम (व्यवस्था) निर्माण करण्यासाठी गुंतवणूक करण्यात येईल. आम्हाला भारताच्या भविष्यावर आणि त्याच्या डिजिटल अर्थव्यवस्थेवर विश्वास आहे हेच या गुंतवणूकीमधून दिसून येत आहे, असे पिचई यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

First Published on: July 14, 2020 6:59 AM
Exit mobile version