‘गुगल’ करणार जगभरातील डास नष्ट…

‘गुगल’ करणार जगभरातील डास नष्ट…

थंडीच्या दिवसात डासांचे प्रमाण हमखास वाढते. आपल्या आजूबाजूला सततत घोंगावणारे हे डास अनेक आजारांना निमंत्रण ठरु शकतात. डासांमुळे मलेरिया, डेंग्यू, झिका किंवा चिकनगुनियासारखे अनेकविध आजार पसरतात. धक्कादायक बाब म्हणजे, समोर आलेल्या आकडेवारीनुसार डासांमुळे पसरणाऱ्या या आजारांमुळे दरवर्षी जगभरात सुमारे १० लाख लोकांचा बळी जातो. शास्त्रज्ञांच्या आणि संशोधकांनी जारी केलेल्या माहितीनुसार, जगभरात डासांच्या साधारण ३ हजार ५०० प्रजाती आढळतात. दरम्यान, लाखो लोकांच्या मृत्यूचे कारण ठरणाऱ्या या डासांना नष्ट करण्यासाठी आता ‘Google’ने पुढाकार घेतला आहे. एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, ‘गुगल’ची पॅरेंट कंपनी असलेल्या अल्फाबेट या कंपनीने जीवघेणे आजार पसरवणाऱ्या डासांचा संपूर्णत: नायनाट करण्यासाठी कंबर कसली आहे. आम्ही निर्मिती करत असलेल्या या अनोख्या आविष्कारामुळे जागातून डासांचे अस्तित्व नष्ट होईल, असा दावा कंपनीने केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

 ‘अल्फाबेट’ कंपनीचा अनोखा आविष्कार…

प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ही कंपनी एका स्मार्ट कॉन्टॅक्ट लेन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अ‍ॅप्लिकेशनच्या मदतीने डासांचा नायनाट करणार आहे. ‘गुगल’ने यासाठी खास एका हेल्थ चीफ एक्झिक्युटिव्हचीही नियुक्‍ती केली आहे. विशेष म्हणजे अल्फाबेटच्या या लोकोपयोगी प्रोजेक्टला मदत करण्यासठी अनेक देशांच्या सरकारने तसंच उद्योजकांनी तयारी दर्शवली आहे. पुढील वर्षी अर्थात २०१९ मध्ये ‘गुगल’ आणि ‘अल्फाबेट’ या कंपन्या त्यांच्या या महत्वाकांक्षी प्रोजेक्टला सुरुवात करणार असल्याचं समजतंय. दरम्यान, डासांचा समूळ नायनाट करण्यासाठी बनवण्यात येणाऱ्या त्या स्मार्ट कॉन्टॅक्ट लेन्सची माहिती लवकरच जगासमोर उघड केली जाणार आहे.

आकडेवारीनुसार, सध्या जगभरातील १०६ देशांमध्ये मलेरियाचा धोका खूप जास्त आहे. भारताचा विचार करायचा झाल्यास आतापर्यंत महाराष्ट्र, मध्यप्रदेश, ओरिसा, झारखंड, छत्तीसगड आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये मलेरियाचे सर्वात जास्त रूग्ण आढळून आले आहेत. २०१६ साली संपूर्ण जगात सुमारे साडेचार लाख लोकांचा मलेरियामुळे मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर गुगल आणि अल्फाबेट कंपनीची ही ‘डास मिटाओ’ योजना भविष्यात लोकांसाठी दिलासादायक ठरेल.

 

First Published on: December 29, 2018 2:38 PM
Exit mobile version