Lockdown: कोणती दुकाने बंद राहणार कोणती सुरु? वाचा केंद्र सरकारचे नवे नियम

Lockdown: कोणती दुकाने बंद राहणार कोणती सुरु? वाचा केंद्र सरकारचे नवे नियम

या अटींसह आजपासून कोणती दुकाने सुरु होणार? जाणून घ्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे देशभरात अत्यावश्यक सेवा सोडता इतर सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, दुकाने, मॉल्स बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला. काही अटींसह सरकारने आता दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता दुकानदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दुकानांना जरी परवानगी देण्यात आली असली तरी मॉल्स मात्र बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच कोणती दुकाने उघडी ठेवावीत? कोणती नाही याबाबत मात्र, सर्वांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर आज, शनिवारी सकाळी केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

या ठिकाणची दुकाने बंद राहणार

गाव पातळीवर मॉल्स व्यतिरिक्त सर्व दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. परंतु, कॅन्टोनमेंट झोन किंवा कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठिकाणातील सर्व दुकाने बंद राहणार आहेत. या दुकानांना परवानगी देण्यात आलेली नाही.

शहरांमधील महापालिका आणि नगरपालिका हद्दीतील सर्व स्टँडअलोन शॉप्स, रहिवासी परिसरातील दुकाने आणि रेसिंडेन्सिअल कॉप्लेक्समधील दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर बाजारपेठांमधील दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे शॉपिंग मार्केट, मार्केट कॉम्पलेक्स आणि शॉपिंग मॉल्स बंद राहणार आहेत. दरम्यान, गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शॉप्स अँड एस्टॅबलिशमेंट कायद्याअंतर्गत नोंदणीकृत दुकांनांनाच सूट देण्यात आली आहे, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, राज्य सरकार मात्र, आपल्या अधिकारानुसार दुकाने सुरू ठेवायची अथवा नाही यावर निर्णय घेऊ शकतात. तसेच सामान्य दुकानांना ५० टक्के कामगारांसह काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच काम करणाऱ्यांना मास्क घालणे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.


हेही वाचा – निवृत्त आयएएस अधिकारी संजय कोठारी यांची मुख्य दक्षता आयुक्तपदी नियुक्ती


First Published on: April 25, 2020 3:32 PM
Exit mobile version