टोळधाडीवर नियंत्रण करण्यासाठी ड्रोनमधून कीटकनाशक फवारणार

टोळधाडीवर नियंत्रण करण्यासाठी ड्रोनमधून कीटकनाशक फवारणार

टोळ कीटकांचे आक्रमण

पाकिस्तानहून आलेल्या टोळ कीटकांनी देशभरातील अनेक राज्यातील जिल्ह्यांमध्ये शेतीचे नुकसान केले आहे. उत्तरेपासून सुरुवात केल्यानंतर हे कीटक आता महाराष्ट्राच्या विदर्भात देखील येऊन पोहोचले आहेत. सरकारने या टोळधाडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोहिम हाती घेतली असून ड्रोनद्वारे कीटकांवर फवारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी मंत्रालयाने बुधवारी याची घोषणा केली. नागरी उड्डाण मंत्रालयाने २१ मे रोजी काही अटीसहीत टोळ कीटकांच्या विरोधात मोहिम उघडण्यासाठी रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट सिस्टिम वापरण्यासाठी मंजूरी दिली होती.

टोळधाड नियंत्रणात आणण्यासाठी ड्रोनवरुन किटकनाशक फवारण्यात येणार आहे. यासाठी सरकारने निविदा काढल्या असून दोन कंपन्यांची निवड देखील केली आहे. ड्रोनच्या माध्यमातून मोठे झाड आणि दुर्गम भागातील परिसरावर एरियल स्प्रेइंग म्हणजेच हवेतून शिडकाव केला जाणार आहे. तसेच टोळ कीटकांचा नायनाट करण्यासाठी सकारने ६० स्प्रेअर देखील युकेवरुन मागवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कीटकनाशकांवर फवारणी करण्यासाठी ५५ गाड्या विकत घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

या ड्रोनमध्ये १० लिटर केमिकल स्टोअर करण्याची जागा आहे. तसेच हे ड्रोन आवाजही करु शकतात. ज्याने कीटकांना दुसऱ्या जागेवर उडून जाण्यास प्रवृत्त केले जाऊ शकते. ज्या ठिकाणी फवारणी करणारे वाहन जाऊ शकत नाही, अशा अडचणीच्या आणि डोंगराळ भागात जाऊन हे ड्रोन फवारणी करु शकतील. कृषी मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, “लवकरच ३० ड्रोन्स या कामासाठी रुजू करण्यात येणार आहेत. ड्रोनला लावलेला स्प्रे टँक हा १० मिनिटांच्या फवारणीतच संपेल. त्यानंतर जवळच असलेल्या ट्रॅक्टरमधून केमिकलची टाकी रिफील केली जाईल. त्यामुळे पुन्हा एकदा ड्रोन फवारणीसाठी सज्ज होऊ शकतो.”

कृषी मंत्रालयाने घेतलेल्या आढाव्यानुसार २६ मे पर्यंत राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब या राज्यांमधील ४७,३०८ हेक्टर क्षेत्रावर टोळ कीटकाचा प्रतिबंध करण्यात आलेला आहे. आतापर्यंत राजस्थानच्या २० आणि मध्य प्रदेसच्या ९ जिल्ह्यांमध्ये टोळ कीटकांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.

First Published on: May 28, 2020 10:15 AM
Exit mobile version