Corona Vaccination: राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी घेतली कोरोना लस

देशभरात कोरोनाचा कहर सुरू असून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी १६ जानेवारीपासून मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू आहे. सध्या देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू असून दुसऱ्या टप्प्यादरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोनाची लस घेतल्याचे समोर आले आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी शुक्रवारी मुंबईतील सर जे.जे. समूह शासकीय रुग्णालय येथे जाऊन कोविड-१९ विरोधी कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोव्हॅक्सीन ही कोरोनाची लस टोचून घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, डॉ. विजय सुरासे आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस

दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मार्च रोजी कोरोनाची लस घेतली आहे. नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या लसीचा पहिला डोस टोचून घेतला आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ट्विट केलं. ते म्हणाले की, ‘कोरोना लसीचा पहिला डोस मी एम्स रुग्णालयात घेतला. कोरोना विरुद्धातील जागतिक लढाईला बळकट करण्यासाठी आपल्या डॉक्टरांनी आणि वैज्ञानिकांनी जे कार्य केले ते उल्लेखनीय आहे. मी लस घेण्यासाठी पात्र असलेल्या सर्वांना आवाहन करतो. एकजुटीने आपण भारत कोरोनामुक्त करुया!’

First Published on: March 5, 2021 12:22 PM
Exit mobile version