Gujarat Election 2022 : भाजपा उमेदवारावर प्राणघातक हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत

Gujarat Election 2022 : भाजपा उमेदवारावर प्राणघातक हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत

गुजरात विधानसभा निवडणुकीत नवसारी जिल्ह्यातील वांसदा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पीयूष पटेल यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या हल्ल्यानंतर पीयूष पटेल यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, हल्ल्याप्रकरणी भाजपाने कॉंग्रेसवर आरोप केले आहेत. (Gujarat Assembly Election 2022 Attack on Bjp Candidate Vansda Piyush Patel)

मिळालेल्या माहितीनुसार, नवसारी जिल्ह्यातील वांसदा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पीयूष पटेल यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. पियुष पटेल वांसदा येथील झारी गावात होते. तेव्हा त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. भाजपने काँग्रेस उमेदवार अनंत पटेल यांच्या समर्थकांवर हल्ल्याचा आरोप केला आहे. तसेच, या हल्ल्यानंतर वांसदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पियुष पटेल यांच्या समर्थकांनी वांसदा पोलीस ठाण्याबाहेर काँग्रेस पक्षाविरोधात घोषणाबाजी केली. वांसदा हा गुजरातमधील 182 विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा नवसारी जिल्ह्याचा एक भाग असून अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाचा भाग म्हणून गुजरातच्या वांसदा जागेवरही मतदान होत आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला गुरूवारी सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. मतदानाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कच्छ, सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील 19 जिल्ह्यांतील 89 मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 788 उमेदवार रिंगणात आहेत. 2 कोटींहून अधिक मतदार आज राजकीय पक्षांचे भवितव्य ठरवणार आहेत.


हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची दिल्लीने स्पर्धा ठेवली का? संजय राऊतांचा भाजपाला सवाल

First Published on: December 1, 2022 11:38 AM
Exit mobile version