Gujarat Election 2022 : पहिल्या टप्प्यात आज 89 जागांसाठी मतदान, 788 उमेदवार रिंगणात

Gujarat Election 2022 : पहिल्या टप्प्यात आज 89 जागांसाठी मतदान, 788 उमेदवार रिंगणात

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज, गुरुवारी होणार आहे. दक्षिण गुजरात आणि कच्छ-सौराष्ट्र भागांत 19 जिल्ह्यांतील 89 जागांसाठी दोन कोटींहून अधिक मतदार 788 उमेदवारांना मतदान करतील. यामध्ये सौराष्ट्रातील 48, कच्छमधील 6 आणि दक्षिण गुजरातमधील 35 जागांचा समावेश आहे. आता अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचा (आप) देखील या निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश झाल्याने गुजरातमध्ये भाजपा, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे.

आपने विधानसभेच्या 182 पैकी 181 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. पहिल्या टप्प्यात भाजप आणि काँग्रेसचे 89-89 उमेदवार आणि ‘आप’चे 88 उमेदवार रिंगणात आहेत. सुरत पूर्व येथील आप उमेदवार कंचन जरीवाला यांनी शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. भाजपाच्या दबावामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचा दावा आपने केला होता. पण जरीवाला यांनी तो फेटाळून लावला. माझ्या प्रचारादरम्यान लोक मला विचारायचे की, मी देशद्रोही आणि गुजरातविरोधी पक्षाचा उमेदवार का झालो? त्यानंतर सद्सद्विवेकबुद्धीने निर्णय घेतला आणि कोणत्याही दबावाशिवाय उमेदवारी मागे घेतली. मी गुजरातविरोधी आणि देशविरोधी पक्षाला पाठिंबा देऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

पहिल्या टप्प्यात एकूण 788 उमेदवारांपैकी 718 पुरुष आणि 70 महिला आहेत. भाजपाने नऊ, काँग्रेसने सहा आणि आपने पाच महिला उमेदवारांना तिकीट दिले आहे. पहिल्या टप्प्यात मायावतींच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षाने (BSP) 57, भारतीय ट्रायबल पार्टीने (BTP) 14, समाजवादी पार्टीने 12, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने चार, भारतीय कम्युनिस्ट पार्टीने दोन उमेदवार रिंगणात उतरवले असून 339 अपक्ष उमेदवार आहेत.

पहिल्या टप्प्यात आज, गुरुवारी राजकोट, सुरेंद्रनगर, कच्छ, मोरबी, जामनगर, देवभूमी द्वारका, पोरबंदर, जुनागढ, गीर सोमनाथ, अमरेली, भावनगर, बोताड, नर्मदा, भरूच, सुरत, तापी, डांग्स, नवसारी आणि वलासड या जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. यासाठी 25 हजार 434 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. शहरी भागातील 9 हजार 18 आणि ग्रामीण भागातील 16 हजार 416 केंद्रांवर मतदान होणार आहे. 2017च्या निवडणुकीत या जागांवर 68 टक्के मतदान झाले होते.

First Published on: December 1, 2022 7:15 AM
Exit mobile version