मोरबी पूल दुर्घटना; आरोपी जयसुख पटेल न्यायालयासमोर शरण

मोरबी पूल दुर्घटना; आरोपी जयसुख पटेल न्यायालयासमोर शरण

संग्रहित छायाचित्र

गुजरातः मोरबी पुल दुर्घटनेतील आरोपी ओरेवा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक जयसुख पटेल हे मंगळवारी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात शरण आले. त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते.

गेल्याच आठवड्यात विशेष तपास पथकाने या दुर्घटनेचे आरोपपत्र दाखल केले. या १२६२ पानी आरोपपत्रात पुलाचे संचालन करणाऱ्या जयसुख पटेल यांनाही आरोपी करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. अटक टाळण्यासाठी पटेल यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. न्यायालयाने पटेल यांचा अटकपू्र्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता.

गेल्या वर्षी गुजरातमधील मोरबी भागातील मच्छू नदीत एक केबल पूल कोसळल्याची घटना घडली होती. यात १३५ जणांचा मृत्यू झाला. मोरबी पूल दुर्घटनेनंनतर तीन महिन्यांनी पोलिसांनी याचे आरोपपत्र दाखल केले. पोलीस उपअधीक्षक पी. एस. जाला यांनी मोरबी सत्र न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केले. मोरबी पुल दुर्घटनेप्रकरणी आतापर्यंत नऊ आरोपी पोलीस कोठडीत असून, दहावा आरोपी म्हणून ओरेवा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक जयसुख पटेल यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. या दुर्घटनेनंतर काँग्रेसने भाजपवर ओरेवाच्या मालकाला वाचवल्याचा आरोप केला होता.

याप्रकरणी आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे. दीपक पारेख (ओरेवा कंपनीचे व्यवस्थापक), दिनेशभाई महासुखराय दवे, मनसुख बलजीभाई टोपिया (तिकीट क्लर्क), कंत्राटदार प्रकाशभाई लालजीभाई परमार, ठेकेदार देवांगभाई प्रकाशभाई परमार, सुरक्षारक्षक अल्पेशभाई, दिलीपभाई आणि मुकेशभाई यांना अटक करण्यात आली आहे. गांधीनगरपासून ३०० किमी अंतरावर मच्छू नदीवर बांधलेला हा मोरबी पूल ७ महिन्यांपासून बंद होता. पुलाच्या दुरुस्तीचे काम अजिंठा मॅन्युफॅक्चरिंग (ओरेवा ग्रुप) यांना मिळाले. ही कंपनी घड्याळे, एलईडी दिवे, सीएफएल बल्ब, ई-बाईक बनवते. मात्र, आता अजिंठा मॅन्युफॅक्चरिंगने दुरुस्तीचे कंत्राट अन्य काही कंपनीला दिल्याचे समोर आले आहे.

आरोपपत्र दाखल झाल्याने पुढील सुनावणीत आरोपींवर आरोप निश्चिती होईल. आरोपींनी आरोप मान्य केल्यास त्यांना शिक्षा सुनावली जाईल. आरोपींनी आरोप फेटाळल्यास याचा रितसर खटला चालेल.

First Published on: January 31, 2023 9:01 PM
Exit mobile version