कुणाचं काय तर कुणाचं काय! गुजरातमध्ये ड्रोनने पोहोचवली पान मसाल्याची ऑर्डर!

कुणाचं काय तर कुणाचं काय! गुजरातमध्ये ड्रोनने पोहोचवली पान मसाल्याची ऑर्डर!

लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून आणि तो वाढवल्यापासून तळीरामांची आणि नशेडींची चांगलीच पंचाईत झाली आहे. व्यसन असल्यामुळे ती गोष्ट मिळाली नाही, तर ते भयंकर अस्वस्थ होत आहेत. दारू न मिळाल्यामुळ अशा अनेक वैतागलेल्या तळीरामांचे व्हिडिओ आपण सोशल मीडियावर आणि बातम्यांमध्ये पाहिले आहेत. पण आता पान मसाला मिळेना म्हणून एका महाभागानं चक्क ड्रोनवरून पान मसाल्याची ऑर्डर दिल्याचं समोर आलं आहे. त्याच्या पुढचा भाग म्हणजे त्याला ही ‘डिलीव्हरी’ मिळाली देखील! या प्रकरणी २ जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया साईट असलेल्या टीकटॉकवर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. हे महाभाग आहेत गुजरातमधले!

आली लहर, केला कहर!

आख्खा देश लॉकडाऊनमध्ये बंद असताना फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि मागणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त इतर सर्व वस्तू किंवा पदार्थाची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गुजरातमधल्या एका महाभागाची चांगलीच पंचाईत झाली. इतके दिवस लॉकडाऊनमध्ये कंट्रोल केल्यानंतर आता या महाशयांना पानमसाला खाण्याची प्रचंड लहर आली. पण लॉकडाऊनमुळे बाहेरून काही आणता येईना आणि सगळंच बंद असल्यामुळे बाहेर काहीच मिळेना. अखेर, या महाशयांनी अक्कल लढवली आणि ‘ड्रोन डिलीव्हरी’ची शक्कल शोधून काढली!

नसते उद्योग आणि शिक्षेचे भोग!

ड्रोनवरून या महाशयांना मिळालेल्या पान मसाल्याच्या पुड्यांचा व्हिडिओ टीकटॉकवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी लागलीच हातपाय हलवायला सुरुवात केली. ड्रोन उडवण्याची परवानगी नसताना ड्रोन उडवल्याचा गुन्हा तर होताच. वर बंदी असलेला पान मसाला बिनबोभाटपणे मागवण्याचा देखील त्यात समावेश झाला. आणि त्याऊपर लॉकडाऊनमध्ये नसते उद्योग करण्याचा देखील शिक्का डोक्यावर बसला. अखेर पोलिसांनी या प्रकारातल्या दोघा जणांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. पण व्यसन असलेली व्यक्ती ते पुरवण्याचे काही ना काही मार्ग शोधून काढतेच, हे मात्र यातून पुन्हा सिद्ध झालं!

First Published on: April 12, 2020 11:33 PM
Exit mobile version