आता भारतात गाढविणीचं दूध उत्पादन; १ लिटरची किंंमत ऐकून थक्क व्हाल!

आता भारतात गाढविणीचं दूध उत्पादन; १ लिटरची किंंमत ऐकून थक्क व्हाल!

याच आहेत हलारी जातीच्या गाढविणी!

दूध ही आरोग्यासाठी अनेक फायदे देणारी गोष्ट आहे. त्यामुळे गायीचं दूध, म्हशीचं दूध, बकरीचं दूध अशा तीन प्रकारच्या दुधांची त्यांच्यातल्या विविध घटकांनुसार उपयुक्तता ठरवली जाते आणि त्या उपयुक्ततेनुसार त्यांची किंमत देखील! पण या सगळ्या दुधांपेक्षा गाढविणीचं दूध सर्वात जास्त उपयुक्त असतं आणि म्हणूनच त्याची सर्वात जास्त किंमतही असते! त्याचमुळे आता हरियाणाच्या हिस्सारमध्ये देशातली पहिली गाढविणीच्या दुधाची डेअरी सुरू होत असून या डेअरीमधून आलेल्या दुधासाठी भरपूर किंमत देखील चुकवावी लागणार आहे. गाढविणीच्या १ लिटर दुधासाठी ७ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. या दुधामध्ये अनेक पोषक घटक असल्यामुळेच त्याची किंमत इतकी जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये प्रतिकारशक्ती वाढवणारे घटकही मोठ्या प्रमाणावर असतात.

हलारी जातीच्या गाढविणींचं दूध उत्पादन

हिस्सारच्या नॅशनल हॉर्स रिसर्च सेंटरमध्ये या दुधाची डेअरी सुरू करण्यात येणार असून त्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जाणार आहे. हलारी जातीच्या गाढविणींचं दूध या डेअरीतून विकलं जाणार आहे. त्यासाठी या डेअरीमध्ये हलारी जातीच्या १० गाढविणी देखील आणण्यात आल्या आहेत. या दुधामध्ये कॅन्सरसारख्या मोठ्या आजारांचा सामना करण्याची देखील क्षमता असल्याचं सांगितलं जात आहे. या दुधाच्या प्रतीनुसार त्याची २ हजार ते ७ हजार रुपये अशी किंमत ठरवली जाणार आहे. विशेष म्हणजे या दुधापासून अनेक ब्युटी प्रॉडक्ट्स देखील बनवले जातात. लवकरच या डेअरीचं काम सुरू होऊन हे दूध बाजारात विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे. या दुग्धउत्पादनासाठी हलारी जातीच्या या गाढविणींना विशिष्ट पद्धतीने आहार देऊन वाढवण्यात येणार आहे.

First Published on: August 23, 2020 11:43 PM
Exit mobile version