हाथरसच्या मुलीला मिळाला न्याय, हत्याकांडातील मुख्य आरोपी संदीपला जन्मठेपेची शिक्षा

हाथरसच्या मुलीला मिळाला न्याय, हत्याकांडातील मुख्य आरोपी संदीपला जन्मठेपेची शिक्षा

 

नवी दिल्लीः हाथरस हत्याकांडा प्रकरणी उतर प्रदेश येथील विशेष न्यायालयाने आरोपी संदीपला गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. न्यायालयाने संदीपला ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. न्यायालयाने या हत्याकांडातील आरोपी रामू, लवकुश व रवीची निर्दोष सुटका केली.

हाथरसच्या चंदपा भागातील एका गावात १४ सप्टेंबर २०२० मध्ये अनुसूचित जातीच्या एक मुलीवर सामूहिक अत्याचार झाला. गावातील चार मुलांनी तिच्यावर अत्याचार केला आणि तिला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये २९ सप्टेंबर २०२० रोजी या मुलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी मुलीच्या जबाबाच्या आधारे संदीप, रवी, रामू व लवकुश या चार आरोपींना अटक केली होती. सीबीआयने या चारही आरोपींविरुद्ध विशेष न्यायाधीश (एससी-एसटी कायदा) यांच्या न्यायालयात कलम 302, 304, 376A, 376D आणि SC-ACT कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल केले होते. याशिवाय सीबीआयने ६७ दिवस त्यांची चौकशी केली होती.

त्यानंतर या चारही आरोपींविरोधात उतर प्रदेश येथील विशेष न्यायालयात खटला सुरु होता. या चारही जणांवर आरोप निश्चित करण्यात आले. त्यांनी आरोप फेटाळल्याने याचा खटला सुरु झाला. सरकारी व बचाव पक्षाचा युक्तिवाद झाला. सरकारी पक्षाने या घटनेचे पुरावे सादर केले. तर बचाव पक्षाने हे पुरावे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. सुमारे ९०० दिवसांनी न्यायालयाने या खटल्याचा निकाल दिला. यातील तीन आरोपींची न्यायालयाने पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली. तर संदीपला कलम ३०४ अंतर्गत न्यायालयाने दोषी धरले. संदीपला काय शिक्षा द्यावी यावर सरकारी व बचाव पक्षाने युक्तिवाद केला. ही घटना बघता संदीपला कठाेर शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी पक्षाने केली. तर संदीपला कठोर शिक्षा देऊ नये, अशी विनंती बचाव पक्षाने न्यायालयात केली. उभय पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने संदीपला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

उतर प्रदेश पोलिसांनी पीडित मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते. अंत्यसंस्कार करण्याआधी पोलिसांनी पीडित मुलीच्या घरच्यांना याची माहिती दिली नव्हती. या अंत्यसंस्काराचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे योगी सरकारवर टीका झाली होती.

First Published on: March 2, 2023 4:36 PM
Exit mobile version