‘डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळेच चीनची भारताविरोधी आगळीक’

‘डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळेच चीनची भारताविरोधी आगळीक’

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन यांच्यादरम्यान संबंध ताणले गेले आहेत. अक्साई चीनजवळच्या गलवान प्रांतात चीनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्या पार्श्वभूमीवर गलवान खोरे आणि सीमाभाग यावरून दोन्ही देश एकमेकांविरोधात आक्रमक झाले आहेत. मात्र, भारताविरोधी चीन आक्रमक होण्याला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पच कारणीभूत आहेत, असा दावा करण्यात आला आहे. आणि हा दावा दुसऱ्या-तिसऱ्या कुणी केला नसून खुद्द अमेरिकेच्या माजी गृहमंत्री हिलरी क्लिंटन यांनीच केला आहे. त्यामुळे त्यांच्या या दाव्यानंतर अमेरिकेतील राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात हिलरी क्लिंटन २०१६मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षीय निव़डणुकांमध्ये पराभूत झाल्या होत्या. तेव्हापासून त्या ट्रम्प यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करताना हिलरी क्लिंटन म्हणाल्या, ‘ट्रम्प प्रशासनाच्या सातत्य नसलेल्या परराष्ट्र धोरणामुळेच चीन आक्रमक झाला असून त्याचा फटका त्यांच्या स्वत:च्या नागरिकांना आणि शेजारी राष्ट्रांना बसत आहे. यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. ट्रम्प यांच्या कमकुवत परराष्ट्र धोरणामुळेच रशिया आणि चीनला फायदा मिळत आहे. जगभरात ट्रम्प प्रशासनाने घातलेला गोंधळ सगळे पाहात आहेत.

दरम्यान, यावेळी बोलताना हिलरी क्लिंटन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवडून येण्याच्या शक्यतेवर देखील कडाडून टीका केली. ‘डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवडून आले तर काय परिस्थिती निर्माण होईल, याची कल्पना करण्याची देखील माझी हिंमत नाही. जर तसं झालं, तर आपलं होणारं नुकसान भरून निघण्याच्या पलीकडे असेल’, असं त्या म्हणाल्या.

First Published on: July 22, 2020 3:33 PM
Exit mobile version