पबजीच्या वेडापायी ‘पठ्ठ्या’ हिमाचलमधून थेट महाराष्ट्रात!

पबजीच्या वेडापायी ‘पठ्ठ्या’ हिमाचलमधून थेट महाराष्ट्रात!

पबजी

आजकाल तरूणाईमध्ये ऑनलाईन गेमिंगचे चांगलेच फॅड पसरले आहे. अशातच पबजीसारख्या गेमचं तरुणाईला अक्षरश: वेड लागलं आहे. या खेळापायी आजवर अनेक विचित्र घटना घडल्याचं आपल्याला ऐकायला मिळत होतं. मात्र यावेळी पबजी गेम एका मुलाला तब्बल दीड हजार किलोमीटर दूर घेऊन आला आहे. पबजी गेमचं टास्क पूर्ण करण्याच्या नादात हा मुलगा हिमाचल प्रदेशातून थेट औरंगाबादला पोहोचला आहे. पोलिसांच्या मदतीने या अल्पवयीन मुलाला पुन्हा हिमाचल प्रदेशला पाठवण्यात आले आहे.

फोन लोकेशनद्वारे मुलाचा तपास

हिमाचल प्रदेशातील कुनिहार जिल्ह्यातील एक अल्पवयीन १७ फेब्रुवारी रोजी अचानक घरातून गायब झाला. यानंतर कुटुंबीयांनी कुनिहार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांच्या तपासात त्याच्या फोनचे लोकेशन हे महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये सापडले. यानंतर कुनिहार पोलिसांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून मुलाला सुरक्षितपणे ताब्यात घेण्याची विनंती केली. त्यानुसार पोलिसांनी किशोरला सुरक्षितपणे ताब्यात घेतले.

टास्क पूर्ण करण्यासाठी घरातून निघाला

अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. शिवकुमार शर्मा यांनी सोलन येथील घटनेची माहिती देताना सांगितले की, ‘पबजी गेम खेळत असताना हा तरूण आपले टास्क पूर्ण करण्यासाठी घराबाहेर पडला. पण खेळण्याच्या नादात आपल्या घरापासून काही शेकडो किलोमीटर अंतरावर तो महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील मनमाडला पोहोचला हेही त्याला कळले नव्हते. त्याला घेऊन जाण्यासाठी कुनिहार पोलीस आणि मुलाचे कुटुंबीय निघाले आहेत.

First Published on: February 22, 2020 8:14 PM
Exit mobile version