कमलेश तिवारी हत्या प्रकरणाचे गूढ उकलले; उत्तर प्रदेश पोलिसांचा दावा

कमलेश तिवारी हत्या प्रकरणाचे गूढ उकलले; उत्तर प्रदेश पोलिसांचा दावा

हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येचे गूढ उकलल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे. उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक ओ.पी. सिंग यांनी लखनौमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत या घटनेची माहिती दिली. दरम्यान उत्तर प्रदेश आणि गुजरात पोलिसांनी मिळून गुजरातमधून तिघांना अटक करुन त्यांची चौकशी केली आहे. यावेळी त्यांनी कमलेश तिवारी यांच्या हत्येमागील कारणही सांगितले आहे.

काय म्हणाले ओ.पी.सिंग?

ओ.पी.सिंग म्हणाले की, “उत्तर प्रदेश आणि गुजरात पोलिसांच्या संयुक्त पथकाने ३ जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली आहे. मौलाना मोहसीन शेख, फैझान, खुर्शिद अहमद पठाण असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली होती. पण नंतर त्यांना सोडून देण्यात आले.” ओ.पी.सिंग पुढे म्हणाले की, “हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येमागील गूढ उकलले आहे. २०१५ मध्ये कमलेश तिवारी यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

First Published on: October 19, 2019 1:37 PM
Exit mobile version