आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन, कोणते मुद्दे गाजणार?

आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन, कोणते मुद्दे गाजणार?

Union Cabinet Approves Women's Reservation Bill

नवी दिल्ली – संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. पुढे २३ दिवस म्हणजेच २९ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनाच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाली १० वाजता प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत. पावसाळी अधिवेशनानंतर देशात बरेच मुद्दे चर्चिले गेले. या सर्व मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाप्रमाणेच हिवाळी अधिवेशनही वादळी ठरण्याची शक्यता आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरले होते. विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले होते. आता हिवाळी अधिवेशनात विरोधक कोणत्या मुद्द्यांवर आक्रमक होतात हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, २३ दिवसांच्या अधिवेशनात १७ बैठका होणार आहेत.

महाराष्ट्रातील अनके मुद्दे संसदेच्या अधिवेशनात चर्चिले जाण्याची शक्यता आहे. नुकताच गाजत असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरही अधिवेशनात चर्चा होणार आहे. याप्रकरणी अमित शहा लक्ष घालणार असल्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर संसदेत काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष आहे.

महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेसने भारत जोडो यात्रा काढली आहे. हेच मुद्दा पुन्हा संसदेत उपस्थित केले जाणार आहेत. भारत – चीन सीमावाद, घटनात्मक संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप आदी मुद्देही उपस्थित केले जाऊ शकतात.

डेंटल कमिशन विधेयक, राष्ट्रीय नर्सिंग आणि मिडवायफरी कमिशन विधेयक, मल्टिस्टेट सहकारी संस्था सुधारणा विधेयक, जुने अनुदान लिनियमन विधेयक, वन संरक्षण संशोधन विधेयक आदींसह १६ विधेयके अधिवेशनात सादर केली जाणार आहेत.

आर्थिक क्षेत्रातील सुधारणांची प्रक्रिया जलद होण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. यानुसारच, सरकार तीन विधायक आणण्याच्या तयारीत आहे. आंतरराज्यीय सहकारी समिती संशोधन विधेयकानुसार सरकार सहकारिताच्या क्षेत्रात जुन्या कायद्यांमध्ये सुधारणा करण्याच्या तयारीत आहे. तसंच, ट्रेड मार्क संशोधन विधायकावरही चर्चा होऊ शकते. हे विधेयक मंजूर झाल्यास संपूर्ण जगभरात ट्रेड मार्क घेण्याचा अधिकार प्राप्त होऊ शकेल.

अधिवेशन जुन्याच इमारतीत

संसदेचे हिवाळी अधिवेशन नव्या इमारतीत होईल, अशी ग्वाही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पावसाळी अधिवेशनात दिली होती. मात्र, इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले नसल्याने यंदाचे अधिवेशन जुन्याच इमारतीमध्ये होणार आहे.

First Published on: December 7, 2022 7:49 AM
Exit mobile version