प्रियांका गांधींना व्हेरिफाईड ट्विटर अकाऊंट मिळालंच कसं?

प्रियांका गांधींना व्हेरिफाईड ट्विटर अकाऊंट मिळालंच कसं?

प्रियांका गांधी वाड्रा यांच्या राजकारणातल्या प्रवेशापेक्षाही किंबहुना त्यांच्या ट्विटरवरच्या प्रवेशाची चर्चा जास्त झाली. ट्विटवर पहिल्या काही तासांमध्येच तब्बल लाखभर फॉलोअर्स प्रियांका गांधींना मिळाले. एवढंच काय, एकही ट्विट न करता प्रियांका गांधींचे तब्बल ४० हजार फॉलोअर्स झाले होते. त्यामुळे सोशल मीडियावर प्रियांका गांधी हे नाव पुढच्या काही महिन्यांमध्ये तुफान चालणार याचंच हे द्योतक होतं. मात्र, असं असतानाच एक प्रश्न काही नेटिझन्सकडून विचारला जात आहे. ट्विटरकडून अकाउंट व्हेरिफिकेशनची सेवा जुलै २०१८पासूनच बंद असताना प्रियांका गांधींना लगेचच व्हेरिफाईड ट्विटर अकाउंट कसं मिळालं?

व्हेरिफाईड अकाउंट म्हणजे काय?

कुणाचंही ट्विटर अकाउंट पाहाताना काहींच्या नावापुढे निळ्या रंगाची टिकमार्क आपण सगळेच पाहातो. मोठमोठ्या नेतेमंडळींच्या आणि सर्वच पक्षाच्या अकाउंट्सच्या नावापुढे ही निळ्या रंगाची टीक तुम्हाला दिसेल. या टीकमार्कचा अर्थ होतो हे अकाउंट व्हेरिफाईड आहे. ते फेक नसून ज्या व्यक्तीच्या नावे हे नोंद आहे, तिनेच ते सुरु केलं असून तीच व्यक्ती ते अकाउंट हाताळत आहे.

आता पाहुयात नेटिझन्सच्या प्रश्नाकडे!

तसं पाहाता सामान्य परिस्थितीमध्ये ट्विटरवर अकाउंट व्हेरिफाय करायला साधारण ८ ते १० दिवस लागतात. तुम्ही अर्ज केल्यानंतर ते अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी ट्विटरला अर्ज करावा लागतो. पण गेल्या साधारण वर्षभरापासून म्हणजेच नोव्हेंबर २०१७ पासून ट्विटरने ही अकाउंट व्हेरीफाय करायची सुविधा तात्पुरती स्थगित केली आहे. मात्र असं असून देखील प्रियांका गांधींना लगेचच व्हेरिफाय अकाउंट मिळालं. त्यामुळे हे कसं शक्य झालं? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

का थांबवली अकाउंट व्हेरिफाय सुविधा?

याआधी ट्विटरचा विशिष्ट फॉर्म भरल्यानंतर काही दिवसांमध्ये अकाउंट व्हेरिफाय होत होतं. मात्र, त्यामुळे कुणीही अकाउंट व्हेरिफाय करून घेऊ लागलं. अकाउंट व्हेरिफाय करणं ही सुविधा वापरणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी होती. पण व्हेरिफाय अकआउंट जास्त महत्त्वाची असल्याचा गैरसमज निर्माण होऊ लागला. यामध्ये समाजविघातक प्रवृत्ती, व्यक्ती, संस्थाही व्हेरिफाय अकाउंटवरून चुकीच्या किंवा समाजविरोधी गोष्टींचा प्रसार करत असल्याचं लक्षात आल्यामुळे ट्विटरने ही सुविधा स्थगित केली आहे. जोपर्यंत, नक्की कुणाचे अकाउंट व्हेरिफाय करायचे? याविषयी निश्चित नियमावली ठरत नाही, तोपर्यंत ही व्हेरिफिकेशनची सुविधा स्थगित असल्याचं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.

First Published on: February 12, 2019 11:10 AM
Exit mobile version