करोनासोबतच अम्फान चक्रीवादळाचा भारताला धोका

करोनासोबतच अम्फान चक्रीवादळाचा भारताला धोका

भारताच्या किनारपट्टीला लवकरच अम्फान हे चक्रीवादळ धडकणार असल्याची माहिती मिळाली असून, हे वादळ विक्राळ रूप धारण करणार असल्याचेही हवामान खात्याने सांगितले आहे. दिल्ली हवामान खात्याचे संचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, अम्फान या वादळाचे १२ तासांत सुपर चक्रीवादळात रुपांतरण होईल. ते आता उत्तर-ईशान्येच्या दिशेने सरकत असून, २० मे रोजी दुपारी किंवा संध्याकाळी ते दिघा-हटिया बेट पार करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यावेळी त्याची गती १५५-१६५ ताशी किमी असू शकते आणि तीव्र असल्यास ती १८५ ताशी किमी असू शकते. या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीची बैठक बोलावली आहे.

चक्रीवादळ अम्फान सोमवारी भयंकर स्वरुप धारण करणार असून, ओडिशाच्या किनारपट्टी भागात जोरदार वार्‍यासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. या इशार्‍यानंतर राज्य सरकारने या भागातून ११ लाख लोकांना बाहेर काढण्याची तयारी सुरू केली आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे की, बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी आणि पश्चिम-मध्य भागात ताशी १३ किलोमीटर वेगाने प्रवास करणारे अम्फान १२ तासात वेग वाढवेल आणि शक्तिशाली रूप घेईल. जोरदार वार्‍यामुळे कच्च्या घरांचे बरेच नुकसान होणार असून, घरांचे काही प्रमाणात नुकसान होऊ शकते. वार्‍याच्या जोरदार वेगामुळे वीज व दळणवळणाचे खांब वाकणे किंवा विस्कळीत होणे, रेल्वे सेवा काही प्रमाणात विस्कळीत होऊ शकते आणि वीज केबल्स व सिग्नल यंत्रणा तुटल्या जाऊ शकतात. तसेच या वादळाचा पिके आणि बागांवर परिणाम होऊ शकतो. या वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.

भुवनेश्वरच्या हवामान केंद्राचे संचालक एचआर बिस्वास यांनी सांगितले की, अम्फान केंद्र ओडिशाच्या पारादीपच्या ७९० किलोमीटर दक्षिणेकडे, पश्चिम बंगालमधील दिघाच्या ९४० किलोमीटर दक्षिण-नैऋत्येकडे आणि बांगलादेशातील खेपुपारापासून १०६० किलोमीटर दक्षिण- पश्चिमेकडे असेल. हे चक्रीवादळ वायव्य बंगालच्या उपसागराशेजारील उत्तर-ईशान्य दिशेकडे जाईल आणि २० मे रोजी दुपारी किंवा संध्याकाळी बांग्लादेशातील हटिया बेट आणि पश्चिम बंगालमधील दिघा दरम्यान पश्चिम बंगाल आणि बांगलादेश किनारपट्टीवर जोरदार धडकेल. यावेळी १५५-१६५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, जे कधीही १८५ किमी प्रतितास वेग पकडू शकतील.

First Published on: May 19, 2020 5:45 AM
Exit mobile version