धक्कादायक: हैदराबादच्या बलात्काऱ्यांनी आधीही ३ मुलींना जाळले होते

धक्कादायक: हैदराबादच्या बलात्काऱ्यांनी आधीही ३ मुलींना जाळले होते

दिशा प्रकरणातील आरोपी

हैदराबादमध्ये झालेल्या दिशा बलात्कार आणि हत्येनंतर अवघा देश हादरून गेला होता. त्यानंतर तेलंगणा पोलिसांनी या प्रकरणात पकडलेल्या चारही आरोपींना त्याच ठिकाणी नेऊन त्यांचा एन्काऊंटर केला होता. आता या प्रकरणातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चार आरोपींपैकी दोन नराधमांनी याआधी देखील ९ वेळा अशाच प्रकारचा गुन्हा केला असल्याची कबुली अटकेनंतर दिली होती. त्यापैकी तीन गुन्ह्यांमध्ये त्यांनी पीडितेचा बलात्कार करुन तिची हत्या करत जाळून टाकले होते. तेलंगणा पोलिसांच्या सूत्रांनी ही माहिती दिली असल्याची बातमी इंडिया टुडे या संकतेस्थळाने दिली आहे.

तेलंगणा पोलिसांनी दिशा प्रकरणात चार आरोपींना पकडले होते. चारपैकी मोहम्मद आरिफ (वय २६) आणि चिंताकुंता चेन्नाकेशवुलु (वय २०) हे दोघे विटा वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये काम करत असत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांनीही चौकशीच्या दरम्यान तेलंगणा राज्यातील रंगा रेड्डी, संगारेड्डी आणि म्हाबूनगर येथे बलात्कार, खून आणि त्यानंतर जाळून टाकण्याचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. तर इतर सहा गुन्हे त्यांनी तेलंगणाच्या बाजुला असलेल्या कर्नाटक राज्याच्या सीमेवर केले होते. हे दोघेही कर्नाटक ते हैदराबाद विटा वाहून नेणाऱ्या ट्रकरवर काम करायचे.

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरिफ आणि चेन्नाकेशवुलु हे जवळपास १५ गुन्ह्यांमध्ये सहभागी होते. पोलिसांनी आता आजुबाजूच्या महामार्गालगत जळालेल्या अवस्थेत आढळून आलेल्या मृतदेहांची चौकशी सुरु केली आहे. तेलंगणामधील सायबराबाद येथील पोलिसांची एक तुकडी कर्नाटक राज्यातील रायचूर, कलबुर्गी आणि कोप्पाल जिल्ह्यात तपासासाठी पाठविण्यात आलेली आहे.

First Published on: December 18, 2019 12:47 PM
Exit mobile version