मी भाजपमध्ये जाणार नाही -सचिन पायलट

मी भाजपमध्ये जाणार नाही -सचिन पायलट

सचिन पायलट

राजस्थानातील राजकीय घडामोडी उत्कंठावर्धक वळणावर आहेत. मी भाजपमध्ये जाणार नाही, अशी मोठी घोषणा राजस्थानचे युवा नेते सचिन पायलट यांनी केली. काँग्रेसने राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केल्यानंतर सचिन पायलट पहिल्यांदाच माध्यमांसमोर आपली सविस्तर प्रतिक्रिया देणार आहेत.

सचिन पायलट यांनी भाजपमध्ये न जाण्याचा निर्णय घेतल्याने ते तिसरी आघाडी अर्थात नवीन पक्ष स्थापन करण्याच्या शक्यता बळावल्या आहेत. काँग्रेसने उगारलेल्या कारवाईच्या बडग्यानंतर माजी मंत्री आणि पायलट गटाचे आमदार विश्वेंद्र यांनी हा तर 20-20 सामना असून कसोटी सामना बाकी असल्याचे म्हणत स्वपक्षाला आव्हान दिले होते. त्यामुळे पायलट काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

राज्यभरातून पाठिंबा मिळाल्यानंतर सचिन पायलट यांनी ट्विटमध्ये सर्वांचे आभार मानले होते. आज माझ्या समर्थनार्थ बाहेर पडलेल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आभार. राम, राम! याआधी त्यांनी काँग्रेसच्या कारवाईवर आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. सत्याला व्यथित केले जाऊ शकते, मात्र पराजीत नाही असे सूचक विधान त्यांनी केले होते.

भाजपची बैठक
राजस्थानबाबत भाजपने अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाहीत. राजस्थानमधील भाजपच्या दिग्गज नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे जयपूरमध्ये नव्हत्या. त्यांनी या संदर्भात अद्याप भाष्य केले नाही. दिल्लीत भाजपच्या महत्त्वपूर्ण बैठकीला वसुंधरा राजे हजेरी लावण्याची शक्यता आहे. सचिन पायलट यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपदेखील उघडपणे खेळी करु शकते. केंद्रीय मंत्र्यांसह भाजपच्या अनेक नेत्यांनी सचिन पायलट भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागत असल्याचे म्हटले होते.

काँग्रेसच्या ३०० पदाधिकार्‍यांचे राजीनामे
काँग्रेसने सचिन पायलट यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांची राजस्थानचे उपमुख्यमंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केली. यानंतर राजस्थानमधील अनेक काँग्रेस नेत्यांनी सचिन पायलट यांच्या समर्थनार्थ पक्षातील आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. यात जवळपास 300 पदाधिकार्‍यांचा समावेश आहे. यात जिल्हा आणि विभाग अध्यक्षांचा समावेश आहे. यामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे.

कोणाला पक्ष सोडून जायचे असेल तर ते जाऊ शकतात. त्यामुळे तुमच्यासारख्या तरुण नेत्यांसाठी दरवाजे खुले होतील. -राहुल गांधी, नेते, काँग्रेस

First Published on: July 16, 2020 6:46 AM
Exit mobile version