‘तर एक लाख विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होईल’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली भीती

‘तर एक लाख विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होईल’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली भीती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशातील काँग्रेस आणि भाजप विरोधी मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी सरकारवर कडक शब्दात टीका केली शिवाय विरोधकांनी आता लढायचे की घाबरायचे? असा प्रतिप्रश्न विचारत केंद्राच्या विरोधात एकवटण्याचे आवाहन केले. NEET-JEE परिक्षा घेण्यासोबतच शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर देखील ठाकरेंनी विरोध दर्शविला. अमेरिकेचे उदाहरण देताना ठाकरे म्हणाले की, शाळा उघडल्या तर किमान एक लाख विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो.

NEET-JEE परिक्षेच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज कोरोना व्हायरसचा धोका आणखी वाढलेला आहे. संसर्ग पसरत चालला आहे. जर आपण जूनमध्ये परिक्षा घेतल्या नाहीत, तर मग आता का घेत आहोत? जर आता शाळा उघडल्या तर किमान एक लाख मुलांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, यावर देखील आपल्याला विचार करावा लागेल.”

आपला मुद्दा पटवून देण्यासाठी ठाकरेंनी अमेरिकेचे उदाहरण दिले. अमेरिकेत शाळा उघडल्यानंतर ९७ हजार मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे आपल्याकडे शाळा उघडल्यास यापेक्षा अधिक भयानक परिस्थिती उद्भवू शकते, असेही ते म्हणाले. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने महाराष्ट्रात कोरोनाविरोधात लढत आहेत, त्याचे कौतुक केले.

 

First Published on: August 26, 2020 7:17 PM
Exit mobile version