पंतप्रधान नरेंद्र मोदींना ओपन चॅलेंज; ‘हिम्मत असेल तर हैद्राबादमधून लढा’!

पंतप्रधान नरेंद्र मोदींना ओपन चॅलेंज; ‘हिम्मत असेल तर हैद्राबादमधून लढा’!

असदुद्दीन ओवेसींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ओपन चॅलेंज

२०१९च्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना आता आव्हाने आणि आरोप – प्रत्यारोपांना सुरूवात झाली आहे. ‘हिम्मत असेल तर हैद्राबादमधून निवडणूक लढवा, तुमचा पराभव निश्चित असेल’ असे खुल्ले आव्हान एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना दिले आहे. हैद्राबादमधून लढल्यास तुमचा पराभव निश्चित असल्याचे देखील ओवेसी यांनी म्हटले आहे. चार वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ आश्वासनांची खैरात केली. पण, कामाच्या नावाने मात्र शिमगा केला अशी टीका असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. चार वर्षामध्ये लोकांना तुमचा कंटाळा आला असून २०१९च्या निवडणुकीमध्ये लोक तुम्हाला धडा शिकवतील असे देखील ओवेसी यांनी म्हटले आहे. ४ वर्षापासून मोदींच्या कारभाराला देशातील जनता कंटाळली आली. त्यामुळे धडा शिकवण्यासाठी लोक निवडणुकीची वाट पाहत असल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे. पक्षाला ६० वर्षे झाल्याच्या निमित्ताने एका कार्यक्रमात असदुद्दीन ओवेसी बोलत होते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आरोप-प्रत्योरोपांची लाळ उठणार हे नक्की!

आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आता आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. भाजपविरोधात सर्व पक्ष एकत्र येत असून भाजपने देखील आता विरोधकांविरोधात कंबर कसली आहे. विरोधकांचा जोर पाहता आगामी लोकसभा निवडणूक ही रंगतदार होणार हे नक्की! भाजपच्या काळात मुस्लिम, दलित सुरक्षित नसल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे, तर, भाजप देखील त्याच ताकदीने विरोधकांना उत्तर देत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांशी संपर्क साधायला सुरूवात केली आहे. तर, भाजपने देखील कार्यकर्ता शिबिर आणि केलेल्या विकास कामांच्या जोरावर लोकांकडे पुन्हा एकदा भाजपला निवडून द्या अशी हाक द्यायला सुरूवात केली आहे. दस्तुरखुद्द अमित शहा देखील पाठिंब्यासाठी समाजातील प्रतिष्ठीत आणि नामवंत लोकांशी संपर्क साधत आहेत.

विरोधकांची एकजुट शक्य?

विरोधक एकत्र आल्यास भाजपला हरवणे कठीण नसल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले आहे. त्यामुळे देशातील प्रमुख पक्ष भाजपविरोधात एकत्र येणार का? हाच मोठा प्रश्न आहे. शिवाय प्रादेशिक पक्षांचे महत्त्व देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. भाजपचे मित्रपक्ष देखील नाराज असून भाजपने नाराज मित्रपक्षांची मनधरणी करण्यासाठी सुरूवात केली आहे. एकंदरीत सध्याचे देशातील राजकीय वातावरण पाहता २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये चुरस पाहायाला मिळणार आहे.

ओवेसींना भाजप काय देणार प्रत्युत्तर?

हिम्मंत असेल तर हैद्राबादमधून निवडणूक लढवण्याचे आव्हान असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. पण, अद्याप भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे असदुद्दीन ओवेसी यांना भाजप काय प्रत्युत्तर देणार हे पाहावे लागणार आहे.

First Published on: June 30, 2018 3:10 PM
Exit mobile version