सत्ता आल्यानंतर ओवेसींना पळवून लावू – योगी आदित्यनाथ

सत्ता आल्यानंतर ओवेसींना पळवून लावू – योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री उत्तरप्रदेश

तेलंगणामध्ये सत्ता आल्यास अकबरूद्दीन ओवेसींना पळवून लावू असं वक्तव्य उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. योगी यांच्या वक्तव्यानंतर ओवेसी यांनी देखील उत्तर देऊ असं म्हटलं आहे. त्यामुळे अकबरूद्दीन ओवेसी योगी यांना काय उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे. तेलंगणामधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या आरोप – प्रत्यारोप होत आहेत. विकारपूरमधील तंदूर येथे बोलत असताना योगी आदित्यनाथ यांनी थेट अकबरूद्दीन ओवेसींना लक्ष्य केलं आहे. त्याला ओवेसी यांनी ट्विटरवरून तात्काळ उत्तर देत ७ ते १० मध्ये होणारे माझे भाषण ऐकावे असं म्हटलं आहे.

ओवेसींची राहुल, टीडीपीवर टीका 

एमआयएमचे अध्यक्ष अकबरूद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस आणि टीडीपीवर जोरदार प्रहार चढवला आहे. काँग्रेस आणि तेलगू देसम हे दोन्ही पक्ष पाकिटमारांचे पक्ष आहेत अशी टीका अकबरूद्दीन ओवेसी यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी ही टीका केली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जातीयवादाचा आरोप देखील केला आहे. तेलंगणातील तरूणांना कारागृहात डांबून ठेवण्यात आलं आहे. चंद्रबाबू नायडू यांनी अनेकांचं आयुष्य बरबाद केलं आहे. तेव्हा काँग्रेस आणि स्वयंघोषित ‘जनेऊधारी हिंदू’ कुठे होते? असा सवाल अकबरूद्दीन ओवेसी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना केला आहे. राहुल गांधी यांचं आयुष्य राजमहालात गेलं. त्यामुळे त्यांना आमच्या अडचणी आणि समस्यांची जाणीव नाही आहे. राहुल गांधी एक पर्यटक म्हणून भारतात येतात? असा टोला देखील यावेळी ओवेसी यांनी हाणला आहे. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना तुम्ही कधी लाठीमाराला सामोरे गेला आहात का? तुमच्या धर्मावरून तुम्हाला कधी कोणी बोल लावले आहेत का? तुमच्यावर कधीतरी अन्याय झाला आहे का?  असे खडे सवाल केले आहेत. काँग्रेस पैसे देऊन लोकांना आणतं. त्यांना १०० रूपये आणि पाकिट दिलं जातं. असा आरोप देखील ओवेसी यांनी काँग्रेसवर केला आहे. तुम्ही काहीही करा, पण आम्हाला यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही असा विश्वास देखील ओवेसी यांनी व्यक्त केला अाहे. सध्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस, टीडीपी आणि MIMमध्ये जोरदार आरोप – प्रत्यारोप होताना दिसत आहेत.

First Published on: December 2, 2018 8:13 PM
Exit mobile version