‘अणुबॉम्ब आमच्याकडेही’, ओवैसींचा इम्रान यांना इशारा

‘अणुबॉम्ब आमच्याकडेही’, ओवैसींचा इम्रान यांना इशारा

‘पुलवामा’ हल्ल्याप्रकरणी विविध पक्षाचे नेते आपल्या प्रतिक्रिया देत असताना, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना ओवैसी यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. ‘तुम्ही सतत अणुबॉम्बविषयी बोलता. आमच्याकडे अणुबॉम्ब नाहीये असं तुम्हाला वाटतं का?’, असा सवाल ओवैसी यांनी इम्रान खानना विचारला आहे. ‘तुम्ही आधी जैश-ए-मोहम्मद, लश्कर-ए-तोयबाचा खात्मा करा आणि मग बोला’, असा इशाराही त्यांनी दिला आहे. शनिवारी हैदराबादमध्ये एक जनसभेला संबोधित करताना ओवैसी यांनी हे मुद्दे मांडले. ओवैसी यावेळी म्हणाले की, ‘तुम्ही पाकिस्तानच्या संसदेमध्ये बसून टिपू सुलतान, बहादुर शाह जफर यांच्याबद्दल बोलता. मात्र, टिपू सुलतान हे हिंदुंचे शत्रू नव्हते आणि त्यांच्या विरोधात असलेल्या कोणत्याही धर्माच्या लोकांना त्यांनी शत्रूच मानले.’ ‘हा इतिहास वाचण्याची तुम्हाला गरज आहे’, असा टोलाही त्यांनी इम्रानला हाणला.


हिंदुस्थानातल्या मुस्लिमांची चिंता नको

मागील आठवडयात मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात झालेल्या सभेमध्ये बोलतानाही ओवैसी यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली होती. ‘पुलवामा येथील हल्ला पाकिस्ताननेच घडवून आणला. पाकिस्तानवर त्वरित कारवाई झाली पाहिजे. हा हल्ला घडवणारी जैश-ए-मोहम्मद माझ्यादृष्टीने जैश-ए-शैतान आहे’, अशा परखड शब्दांत ओवैसी यांनी पाकिस्तानला चांगलंच धारेवर धरलं होतं. ‘आम्ही मोहम्मद अली जिना यांना त्याचवेळी धुडकावलं आणि हिदुंस्थानला निवडलं हे लक्षात ठेवावं. त्यामुळे हिंदुस्थानातल्या मुस्लिमांची चिंता पाकिस्तानातील राजकारण्यांनी करण्याची गरज नाही’, असंही ओवैसी यांनी त्यावेळी इम्रान खानला सुनावलं होतं.

 

First Published on: March 2, 2019 5:41 PM
Exit mobile version