भारत आणि तालिबान मध्ये औपचारिक चर्चा सुरू

अफगाणिस्तानमधून अमेरिकेने काढता पाय घेताच भारत आणि तालिबान यांच्यात चर्चा सुरू झाली आहे. आज मंगळवारी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे कतार मधील दोहा येथे भारताचे राजदूत दीपक मित्तल आणि दोहामधील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टेनकझई यांच्यात औपचारिक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेवर आणि त्यांना भारतात आणण्याच्या मुद्द्यावर ही चर्चा झाली. तसेच यावेळी तालिबानने अफगाणिस्तानच्या भूमीचा उपयोग भारतविरोधात करू नये असेही भारतातर्फे यावेळी तालिबानला सांगण्यात आले.

याभेटीसंदर्भात परराष्ट्रमंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. यात तालिबानने भारताबरोबर चर्चा करण्याची मागणी केली होती. यामुळे दोहा येथील भारतीय दूतावासात दोन्ही प्रतिनिधीची भेट झाली असे यात सांगण्यात आले आहे.

दोन दिवसांपूर्वीच तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास यांनी भारताबरोबर राजकीय सांस्कृतिक व आर्थिक संबंध कायम ठेवण्यासंर्दभात वक्तव्य केले होते. यामुळे भारत आणि तालिबान यांच्यात आज झालेल्या या चर्चेत नक्की कोणत्या विषयावर चर्चा झाली याकडे जगाचे लक्ष लागून राहीले होते. मात्र यात फक्त अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशात आणण्याबाबत चर्चा झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

First Published on: August 31, 2021 7:52 PM
Exit mobile version