Coronavirus: पावसाळ्यात पुन्हा एकदा कोरोनाची लाट येऊ शकते, शास्त्रज्ञांचा दावा

Coronavirus: पावसाळ्यात पुन्हा एकदा कोरोनाची लाट येऊ शकते, शास्त्रज्ञांचा दावा

प्रातिनिधिक छायाचित्र

भारतात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर कोरोनाचा फैलाव युरोप आणि अमेरिकेच्या तुलनेत कमी झालेला दिसून आला. तसेच लॉकडाऊनला एक महिना झाल्यानंतर आता अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या धीम्यागतीवर आली आहे. मात्र लॉकडाऊन उचलल्यानंतर काही आठवड्यातच पुन्हा एकदा कोरोना व्हायरस डोके वर काढू शकतो. जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता भारतातील काही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर भारत शारिरीक अंतर कसे ठेवतो. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना करतो, त्यावर कोरोनाचा दुसरा फैलाव कसा असेल? हे ठरेल, असेही सांगितले जात आहे.

शिव नादर विद्यापीठाचे प्राध्यापक समित भट्टाचार्य यांनी एका वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. देशात सध्या कोरोनाग्रस्तांचा आकडा स्थिर व्हायला सुरुवात झाली आहे. काही दिवसांनी रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळेल. मात्र हे दिलासादायक चित्र फक्त काही आठवडे किंवा महिन्याभराचे असू शकते. कारण लॉकडाऊन नंतर काही रुग्ण उरले तर ते आणखी कोरोनाचा धोका वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतील, असे भट्टाचार्य यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्ट महिन्यात जेव्हा पावसाळा सुरु होईल, त्यावेळी जर आपण सोशल डिस्टसिंग पाळले नाही तर आपण मोठ्या संकटात अडकू शकतो. बंगळुरुच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेतील प्राध्यापक राजेश सुंदरसेन यांनी भट्टाचार्य यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे. सुंदरसेन पुढे म्हणाले की, लॉकडाऊन नंतर जेव्हा सर्व सुरळीत होईल. तेव्हा कोरोना व्हायरसचा प्रसार पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. चीन सध्या याच समस्येशी झगडत आहे. प्रवासावरील निर्बंध हटविल्यानंतर चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.

२५ मार्च रोजी भारतात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यावेळी भारतात कोरोनाचे केवळ ६१८ रुग्ण होते तर १३ मृत्यू झाले होते. २४ एप्रिल रोजी लॉकडाऊनला एक महिना पुर्ण होत आहे. एका महिन्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा २३ हजार ७७ वर पोहोचला असून ७१८ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.

First Published on: April 24, 2020 6:59 PM
Exit mobile version