गुन्हे तपासणीसाठी फेसबुककडून माहिती मागवण्यात भारत जगात दुसरा

गुन्हे तपासणीसाठी फेसबुककडून माहिती मागवण्यात भारत जगात दुसरा

फेसबूक

सोशल मिडिया सध्या विविध गुन्ह्यांचे आगार झाले आहे. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी संबंधित यंत्रणा सोशल मिडिया साईटवरून माहिती मागवत असतात. यापैकी फेसबुक या साईटवरुन माहिती मागवण्यामधे भारताचा जगात दुसरा क्रमांक लागत असल्याचे समोर आले आहे. भारत सरकार गुन्हे आणि गुन्हेगारांची माहिती मिळविण्यासाठी फेसबूकची मदत घेत आहे. फेसबुकने केलेल्या खुलाश्यानुसार जुलै-डिसेंबर २०१७ या सहा महिन्यात तब्बल १२ हजार १७१ वेळा फेसबुकडून १७ हजार २६२ अकांऊटची माहिती मागवण्यात आली आहे.

भारताने फेसबुकला तब्बल बारा हजार विनंती अर्ज केले होते. जुलै आणि डिसेंबर २०१७ दरम्यान या विनंती केल्या होत्या. भारत सरकारने मागविलेल्या माहितीपैकी ५३ टक्के माहिती फेसबुकने पुरवली आहे. फेसबूकच्या म्हणन्यानूसार २०१७ या वर्षाच्या सुरुवातीच्या ३ महिन्यात या विनंती अर्जांमध्ये तब्बल २३ टक्के वाढ झाली आहे. फेसबूक कडून गुन्हेगारांची माहिती काढण्यासाठी अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. अमेरिकेकडून फेसबूकला डेटासाठी तब्बल ३२,७४२ विनंती अर्ज आले असल्याचे फेसबूकने म्हटले आहे.

या विनंती अर्जामध्ये फेसबूक सोबतच व्हॉटस्अॅप, इंन्स्टाग्राम, मॅसेंजर आणि ऑक्युलस नावाच्या अॅपचा सुध्दा यात समावेश आहे. विनंती अर्जात गुन्हेगारांची प्राथमिक माहिती विचारण्यात आली. उदा. व्यक्तीचे नाव, अकाऊंटसचे रजिस्ट्रेशन कधी झाले? फेसबूकचा वापर कधीपासून होतोय? अशाप्रकारे गुन्ह्यांशी संबंधित असलेल्या लोकांविषयी फेसबूककडून जाणून घेतले जाते. अपहरण, चोरी, दरोडे अशा गुन्ह्यांची उकल या माध्यमातून केली जाते.

डेटा चोरीप्रकरणी फेसबुकचे नवे धोरण

फेसबुकने नुकतेच वापरकर्त्यांच्या खासगी माहितीचा गैरवापर करणारी २०० अॅपलीकेशन्स काढून टाकली आहेत.
केंब्रिज अॅनालिटिकाने ८.७ कोटी फेसबुक युजर्सची माहिती पळवली होती. डेटा चोरीच्या प्रकरणात भारतातीलही अनेक युजर्सची माहिती चोरल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. केंद्र सरकारने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फेसबुक आणि केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीला नोटीस बजावली होती. युजर्सचा डेटा सुरक्षित राहावा, यासाठी आम्ही अनेक महत्त्वाचे बदल करत आहोत, असे उत्तर भारत सरकारने दिलेल्या नोटिशीला फेसबुकने दिले होते.

First Published on: May 17, 2018 3:23 PM
Exit mobile version